बहुप्रतिक्षित स्वारगेट मेट्रो स्टेशन अखेर पुणेकरांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (ता. २९) रोजी दुपारी ४ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुण्यातील सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या भूमिगत मेट्रो मार्गाचे आज लोकार्पण केले. गणेश कला क्रीडा येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या मेट्रोच्या लोकार्पण सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपस्थित होते. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पुणे मेट्रोने केला प्रवास आहे. दरम्यान दुपारी ४ नंतर पुणेकरांसाठी पुणे मेट्रोस्टेशन सर्वांसाठी खुले करण्यात आले. अनेकांनी पुणे मेट्रो स्टेशनला भेट दिली आणि मेट्रोने प्रवास करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
स्वारगेट मेट्रो स्टेशन हे भूमिगत मेट्रो स्टेशन असून पुण्यातील सर्वात मोठे मेट्रो स्टेशन आहे. पुण्याच्या पोटात असलेले हे मेट्रो स्टेशन आतून नक्की कसे आहे हे या व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता. व्हिडिओमध्ये पाहू शकता की, लोकार्पण सोहळ्यानिमित्त मेट्रो स्टेशनमध्ये सर्वत्र लाल कार्पेट पसरले आहे आणि सर्वत्र फुलांची सजावट केली आहे. स्वारगेट मेट्रो स्टेशनचा परिसर अत्यंत भव्य, प्रशस्त आणि अलिशान असल्याचे दिसत आहे. मेट्रो स्टेशनवर सरकत्या जिन्यांवरून नागरिकांची ये-जा सुरु आहे. तिकीट काढण्यासाठी डिजीटल मशीन बसवलेले दिसत आहे. तसेच शनिवारवाड्याची प्रतिकृती देखील मेट्रो स्टेशनमध्ये साकारली आहे. मेट्रोस्टेशनच्या छताला सुंदर सजावट केली आहे. एवढचं काय मेट्रो स्टेशनमध्ये पुणेरी पाट्या देखील दिसत आहे. एका पाटीवर लिहिले आहे पुणे तिथे काय उणे!
स्वारगेट ते जिल्हा न्यायालय या मार्गावरून ही मेट्रो धावणार आहे. बुधवार पेठ, मंडई आणि स्वारगेट अशी तीन स्थानके असून ३.६४ किलोमीटरचा प्रवास ही मेट्रो करणार आहे. स्वारगेट ते मंडईपर्यंत ही मेट्रो भुमिगत असणार आहे त्यानंतर जिल्हा न्यायालयापर्यंत ही मेट्रो मेट्रो पुलावरून धावणार आहे.
इंस्टाग्रामवर puneuntold नावाच्या पेजवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. इंस्टाग्रामवर या पोस्टचे कॅप्शन, “पुण्यातील सर्वात मोठे स्वारगेट मेट्रो स्टेशन आजपासून पुणेकरांचा सेवेत” असे दिले आहे.
स्वारगेट ते जिल्हा न्यायालय मेट्रो सुरु झाल्याने पुणेकरांना खूप आनंद झाला आहे. अनेकांनी व्हिडीओवर कमेंट करून आनंद व्यक्त केला. एकाने लिहिले की,” पुणे आता आंतरराष्ट्रीय शहर झाले आहे.”
दुसऱ्याने लिहिले, “सगळीकडे सीसीटीव्ही लावा आणि थुंकणाऱ्या देशदोह्यांना ५०००चा दंड लावा.”
तिसऱ्याने लिहिले, स्वच्छ असाच राहिल पाहिजे, पुणे तिथे काय उणे”
चौथ्याने लिहिले की, “मेट्रो प्रकल्प आला आणि रिक्षा कॅब यांचा धंदा खूपच कमी झाला म्हणून आता नवीन रिक्षा कोणी घेऊ नका”
पाचव्याने लिहिले की, “Congratulation पुणेकर आपल्याच टॅक्स च्या पैशातून बनले आहे काळजी घ्या आता”
सहाव्याने लिहिले की, “मेट्रो स्टेशन आहे, सहलीचं ठिकाण नाही, याचं भान ठेवा फक्त”