सध्या अनेक रेल्वे स्थानकांवर, ट्रेनमध्ये टीटीईंकडून जोरदार तिकीट तपासणी सुरु आहे. एक प्लॅटफॉर्मवर जवळपास १० ते १५ टीटीई एकाच प्रवाशांची तिकीट चेक करत आहेत. असा असताना दुसरीकडे भाजप नेताच विना तिकीट प्रवास करत असल्याची घटना समोर आली आहे. बिहारमधील एक भाजप नेता विना तिकीट ट्रेनमधून प्रवास करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी टीटीईने जेव्हा त्याला तिकीट विचारले तेव्हा तो चक्क वाद घालण्यास सुरुवात करतोय. विना तिकीट प्रवास करणाऱ्या या भाजप नेत्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
एवढेच नाही हा भाजप नेता टीटीईलाच वरचढ आवाजाच म्हणतोय की, मी आता इथे बसलो आहे, जा कोणालाही बोलवून आणा. तसेच त्याने टीटीईवरच खोटे आरोप केले. भाजप नेत्याने टीटीईबरोबर घातलेल्या या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भारतीय रेल्वेनेही कारवाईचे आदेश दिले आहेत.
बिहारमधील बक्सरचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राणा प्रताप सिंह रेल्वेच्या फर्स्ट एसी कोचमधून विना तिकीट प्रवास करत असल्याचे आढळून आले. यावेळी टीटीईने त्यांच्याकडे आणि त्यांच्या साथीदारकडे तिकीट दाखवण्याची विनंती केली. तिकीट विचारल्याने त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. टीटीई आणि भाजप नेते यांच्यातील वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर लोक भाजपवर निशाणा साधत आहेत.
११ ऑक्टोबर रोजी झियारत एक्सप्रेस (12395) मध्ये ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. पटनाहून ट्रेन निघाली होती. यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राणा प्रताप सिंह या ट्रेनने बक्सरला जात होते. राणा सिंग यांनी टीटीईवर पीएम मोदींबद्दल चुकीचे शब्द वापरल्याचा आरोप केला आहे, तर टीटीईने आरोप केला की, राणा सिंग यांनी त्यांना धक्काबुक्की केली. व्हिडिओमध्ये राणा सिंग टीटीईला सांगतायत की, कुणाला बोलवायचे त्यांना बोलवा, मी ट्रेनमध्येच बसलो आहे, उतरणार नाही.
“चोर तर चोर, वर शिरजोर..”, काँग्रेसने केला आरोप
या प्रकरणावर बिहार काँग्रेसनेही पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. ट्विटरवर एक पोस्ट करत त्यांनी लिहिलेय की, ‘हे बक्सरमधील भाजपचे माजी अध्यक्ष राणा प्रताप सिंह आहेत जे ट्रेनमधून विना तिकीट प्रवास करताना पकडले गेले, यानंतर त्यांनी त्यांच्या संघटनेनुसार आणि त्यांच्या नेत्यानुसार “चोर तर चोर, वर शिरजोर..” या धोरणाचा अवलंब करत मोदींचे नाव रोशन करुन टीटीईला धमकावले.
यावर एका युजरने लिहिलेय की, तो भाजपचा नेता असो वा काँग्रेसचा नेता असो किंवा कोणत्याही पक्षाचा नेता असो, पण तो देशाचा मालक नाही. तुम्ही ट्रेनमध्ये चढलात तर तुम्हाला तिकीट द्यावे लागेल. रेल्वे ही भाजप सरकारची नाही, रेल्वे भारत सरकारची आहे म्हणजेच ती भारतातील लोकांची आहे. तर दुसऱ्या एका युजरने लिहिलेय की, ‘त्यांचे शब्द ऐकल्यानंतर लहान मूलही नेताजी कोणत्या पक्षाचे आहेत हे सांगू शकेल. याशिवाय तिसऱ्या युजरने लिहिलेय की, ‘सर, तो बिहार भाजपचा नेता आहे, तो बक्सर जिल्ह्याचा माजी जिल्हाध्यक्ष राणा प्रताप सिंह आहे, जो एकप्रकारे गुन्हा करत वर भांडतोय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर उत्तर पश्चिम रेल्वेने हे प्रकरण आरपीएफकडे पाठवण्यात आल्याचे ट्विट केले आहे.