बिहारमध्ये दारूबंदी आहे पण तरीही दारु पिणे सुरुच आहे. पोलीस दारू पिणाऱ्या लोकांना अटक करत आहेत. दारूची विक्री आणि तस्करी रोखण्यासाठी सरकार खूप पैसा खर्च करत आहे आणि पकडलेल्यांवर कारवाई केली जात आहे, तरीही राज्यात काही ठिकाणी चोरीछुपे दारु प्यायली जात आहे. नुकताच अशाच प्रकारे पकडलेल्या मद्यपींचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पोलिसांनी त्यांना चांगलीच कसरत करायला लावलेलं दिसत आहे.
वास्तविक, हा व्हिडिओ बिहारमधील भागलपूरचा आहे, जिथे उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे काही मद्यपींना अटक केली होती. अटकेनंतर पोलीस त्या कैद्यांना न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन जात असताना अचानक रस्त्यातच पोलिसांच्या गाडीतील इंधन संपले. त्यानंतर पोलिसांनी कैद्यांना गाडीतून खाली उतरवून कारला ढकलण्यास सांगितले. सर्व मद्यपी गाडीतून खाली उतरले आणि पोलिसांच्या स्कॉर्पिओला धक्का देऊ लागले. त्यांचा हा व्हिडिओ आता सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहे.
(हे ही वाचा : Video: मोबाईल चोरी करुन पळत होता चोर; पण चोराला घडली जन्माची अद्दल, दरवाजाजवळ जाताच काय घडले पाहा…)
या मद्यपींना उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी रात्री उशिरा दारूच्या नशेत अटक केली होती. या चार मद्यपींना एक हवालदार आणि खासगी चालकाच्या मदतीने भागलपूर दिवाणी न्यायालयात हजर राहण्यासाठी पाठवले जात होते. त्यानंतर उत्पादन शुल्क विभागाचे वाहन मध्यंतरी पेट्रोल संपल्याने अचानक थांबले. त्यानंतर सर्व कैद्यांना गाडीतून खाली उतरवून ढकलण्याचे आदेश देण्यात आले. मद्यपी गाडीतून खाली उतरले आणि मागून गाडी ढकलायला लागले. मोठ्या कष्टाने कैद्यांनी वाहन ढकलून दिवाणी न्यायालयापर्यंत पोहोचवले. पोलिसांच्या गाडीतील पेट्रोल संपल्यानंतर चार कैद्यांनी स्कॉर्पिओ कारला ५०० मीटरपर्यंत ढकलकले असल्याची माहिती आहे.
येथे पाहा व्हिडिओ
कैद्यांच्या कमरेला दोरी बांधून ते गाडी रस्त्याच्या कडेला ढकलत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या संपूर्ण घटनेचा कोणीतरी व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. यानंतर बिहार पोलिसांवर बरीच टीका होत आहे. दारूबंदीचे सहायक आयुक्त प्रमोदित नारायण सिंह यांनी सांगितले की, आम्हाला या प्रकरणाची माहिती नव्हती. आत्ताच माहिती मिळाली. या प्रकरणाची चौकशी केली जाईल, यामध्ये जो कोणी दोषी आढळेल त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.