लग्नाचा दिवस कायम स्मरणात राहावा यासाठी वधू-वर आणि कुटुंबीय प्रयत्नशील असतात. यासाठी खाण्यापिण्यासोबत आकर्षक रोषणाई आणि मंडप याकडे लक्ष दिलं जातं. त्याचबरोबर वधूवरांची एन्ट्री कशी असेल यावर चर्चा असते. यासाठी लोकं काय करतील याचा नेम नसतो. कधी वरून, कधी जेसीबीने,कधी स्टेजखालून एन्ट्री असते. लोकांचा क्रेझ पाहून आता बिहारमधील गुड्डू शर्मा या व्यक्तीने नॅनोपासून हेलिकॉप्टर तयार केलं आहे. हे हेलिकॉप्टर हवेत उडणारं नसून लग्न समारंभात त्याचा वापर केला जाणार आहे. एका लग्नासाठी १५ हजार रुपये इतकं भाडं आकारलं जाणार आहे. आतापर्यंत १९ जणांसाठी लग्नासाठी हे हेलिकॉप्टर बूक केलं आहे.
मेकॅनिक गुड्डू शर्मा याने सांगितले की, “डिजिटल इंडियाच्या युगात त्यांचा हा शोध आत्मनिर्भर भारताचे जिवंत उदाहरण आहे. ‘हेलिकॉप्टर’ बनवण्यासाठी दीड लाखांहून अधिक रुपयांची गरज असून, त्याला हायटेक लूक देण्यासाठी दोन लाखांपेक्षा जास्त खर्च येणार आहे. सध्या त्यावर काम सुरु आहे.”
यापूर्वीही बिहारच्या छपरा जिल्ह्यातील मिथलेश प्रसादने टाटा नॅनो हेलिकॉप्टर बनवले आहे. त्यांनी हे हेलिकॉप्टर सात महिन्यात तयार केलं होतं. हे बनवण्यासाठी त्याला ७ लाखांचा खर्च आला होता.