‘यूपी में का बा?’ हे गाणं गाऊन प्रसिद्ध झालेली गायिका नेहा सिंह राठोडने मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. शिवाय तिने सत्ताधाऱ्यांना धारेवर धरल्यामुळे विरोधकांनी तर तिच्या अनेक गाण्याचे जाहीर कार्यक्रमदेखील ठेवले होते. खुद्द उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील तिच्या गाण्याची दखल घेत ‘यूपी में बाबा’ असं उत्तर दिलं होतं. त्यामुळे नेहा सिंह राठोडची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु होती.
अशातच आता नेहा सिंह राठोडने आपल्या गाण्यातून बिहार सरकारला धारेवर धरलं आहे. कारण ‘बिहार में का बा’ या गाण्याचा दुसरा भाग तिने प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये तिने नितीश कुमार सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. या गाण्यातून तिने बिहारमधील गुन्हेगारी, रामनवमीला झालेला हिंसाचार आणि राज्यातील बेरोजगाराबाबत तिने नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यावर निशाणा साधला आहे.
हेही पाहा- किळसवाणा प्रकार! रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये पायात बूड घालून धुतले जातायत बटाटे, पाहा Viral Video
हे गाणं तिने तिच्या भोजपुरी स्टाईलमध्ये गायलं आहे. बिहारमध्ये रामनवमीदरम्यान झालेल्या हिंसाचारावरून विरोधकांनी नितीश कुमार यांच्या सरकारवर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. अशातच नेहाने सरकारला आपल्या गाण्यातून काही प्रश्न विचारले आहेत. त्यामुळे हे गाणं आता राजकीय वादाचा मुद्दा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. नेहाने तिच्या गाण्यात नेमकं काय म्हटलं आहे हे ऐकण्यासाठी तुम्ही हा व्हिडीओच बघा.
गाण्यात कोणते मुद्दे ?
हेही वाचा- भारतीय रेल्वेवर लिहिलेले ‘हे’ पाच अंक आहेत खूप कामाचे! नेमका अर्थ जाणून व्हाल थक्क
नेहाने तिच्या गाण्यात बिहारमधील नालंदा आणि सासाराम येथील हिंसाचाराचा उल्लेख केला आहे. रामनवमीच्या मिरवणुकीत दगडफेक सुरू असताना, काका-पुतणे गिरणीत दळत होते? बिहारमध्ये जंगलराज येण्याची चाहूल लागली आहे, असं म्हणत तिने गाण्यातून १० लाख नोकऱ्या देण्याच्या आश्वासनाची आठवण सरकारला करुन दिली आहे.
नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया –
नेहा सिंह राठोडने या गाण्याचा व्हिडीओ तिच्या @nehafolksinger नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या ट्विटच्या कॅप्शनमध्ये तिने ‘बिहार में का बा’ भाग दुसरा असं लिहिलं आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला असून अनेकजण त्यावर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. काहींनी ही प्रसिद्धीसाठी केलेली स्टंटबाजी असल्याचं म्हटलं आहे तर काहींनी बिहारमधील वास्तव गाण्यातून मांडल असल्याचं म्हटलं आहे.