बिहारमधील दरभंगा येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ती म्हणजे एका उंदरामुळे दरभंगाहून नवी दिल्लीला जाणारी संपर्क क्रांती रेल्वे मध्येच थांबवावी लागली आहे. ही घटना छपरा रेल्वे स्टेशनशी संबंधित असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेत रेल्वेच्या एका डब्याखालून धूर निघत असल्याचं लोकांना दिसलं ज्यामुळे प्रशांमध्ये एकच गोंधळ उडाला.
रेल्वेच्या डब्याखालून धूर निघत असल्याचं पाहताच रेल्वेला आग लागल्याची अफवा पसरली, ज्यामुळे रेल्वेत एकच गोंधळ उडाला. प्रवाशांच्या या गोंधळामुळे रल्वे मध्येच थांबवावी लागली. रेल्वे थांबताच प्रवासी खाली उतरून इकडे-तिकडे पळू लागले, या घटनेबाबतची बातमी आजतकने दिली आहे. या घटनेची चर्चा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरु आहे.
रेल्वे चालक, गार्ड आणि रेल्वे पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असता त्यांना एका डब्यात उंदीर शिरल्याचे समजलं. उंदराने काही इलेक्ट्रीक वायर कुरतडल्यामुळे डब्यात शॉर्ट सर्किट झालं, ज्यामुळे धूर निघाल्याचं उघडकीस आलं. दरम्यान, डब्याची संपुर्ण तपासणी केल्यानंतर रेल्वे पुढे रवाना करण्यात आली.
उंदराने कुरतडल्या तारा –
वाराणसी रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी अशोक कुमार यांनी सांगितले की, १२५६५ बिहार संपर्क क्रांती ट्रेनच्या S4 डब्याखाली उंदीर इलेक्ट्रिक सर्किटमध्ये शिरला होता, ज्यामुळे शॉर्टसर्किट होऊन डब्याखालून धूर निघू लागला, यामुळे प्रवाशांमध्ये रेल्वेला आग लागल्याची अफवा पसरली. तर सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही.
हेही पाहा- “तुमच्या झोपेसाठी रस्त्याची सुरक्षा खाटेवर…?” वाहतूक पोलिसांनी शेअर केलेला मजेशीर Video व्हायरल
उंदरांमुळे धरण कमकुवत –
२०१७ मध्ये बिहारमध्ये उंदरांनी पोलिसांच्या ताब्यात ठेवलेली ९ लाख लिटर दारू पिल्याचा दावा करण्यात आला होता. तर उंदरांनी धरण कमकुवत केल्याचीदेखील एक घटना याआधी उघडकीस आली होती.