बिहारमधील सीतामढी जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डुमश येथील पकटोलामधील एका प्राथमिक विद्यालयामध्ये एका शिक्षकाने तिसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला अश्लील व्हिडीओ दाखवल्याचा आरोप केला जात आहे. यासंदर्भातील माहिती मिळाल्यानंतर पीडित विद्यार्थिनीबरोबरच अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेत येऊन या शिक्षकाला मारहाण केलीय. यावरुन बराच गोंधळ झाल्यानंतर पोलीस अधिकारी पूनम कुमारी घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र पालकांची शाळेबाहेरील वाढती गर्दी पाहून त्यांनी शाळा बंद करण्याचे निर्देश दिले. सोमवारी या प्रकरणाची चौकशी केली जाईल असं सांगून पोलिसांनी शाळेला तात्पुरता टाळा लावला.
नक्की पाहा >> Video: टोल नाक्यावर रुग्णवाहिकेचा भीषण अपघात, रुग्णासह चौघांचा मृत्यू; धक्कादायक घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद
पीडित विद्यार्थीनीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार शाळेतील मुकेश कुमार नावाचा आरोपी शिक्षक त्यांच्या मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवत होता. या संदर्भातील तक्रार मुख्यध्यापक असणाऱ्या मीणा कुमारी यांच्याकडे केली होती. मात्र त्यांनी या तक्रारीकडे दूर्लक्ष केल्याचा आरोप पीडितेच्या आईने केला आहे. असं काही शाळेमध्ये घडलेलं नाही असा दावा मुख्यध्यापकांनी केला.
या मुलीने संबंधित प्रकरणाबद्दल पालकांना आणि गावकऱ्यांना सांगितल्यानंतर मोठ्या संख्येने गावकरी जाब विचारण्यासाठी शाळेत आले. त्यांनंतर हे प्रकरण हाताबाहेर जात असल्याचं दिसल्यानंतर मुख्यध्यापकांनीच फोन करुन पोलिसांना बोलावून घेतलं. शिक्षकाने केलेला प्रकार या विद्यार्थीने पालक आणि गावकऱ्यांना कॅमेरासमोर सांगितल्यानंतर शाळेत घुसून गावकऱ्यांनी शिक्षकाला मारहाण केली. शिक्षकाला मारहाण करण्याबरोबरच त्याचे कपडेही गावकऱ्यांनी फाडले.
नक्की पाहा >> मेट्रो स्थानकावरील चिमुकलीचा हा Video पाहून नक्कीच येईल अंगावर काटा; व्हिडीओला आहेत १० लाखांहून अधिक Views
वेळीच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि त्यांनी शिक्षकाची गावकऱ्यांच्या तावडीतून सुटका करत त्याला ताब्यात घेतलं. या प्रकरणासंदर्भात तपास केला जात असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.