बिहारमधील एका २५ वर्षीय तरुणाने जगातील सर्वात लहान लाकडी चमचा बनवून रणगिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे. हा विश्वविक्रम करण्यासाठी तरुणाने फक्त १.६ मिमी म्हणजेच ०.०६ इंचाचा एक चमचा बनवला आहे. हा चमचा बनवून मायक्रो आर्टिस्ट शशिकांत प्रजापतीने शिल्पकार नवरत्न प्रजापती यांचा विक्रम मोडीत काढला आहे. नवरत्नने २०२२ मध्ये २ मिमी (०.०७ इंच) चमचा बनवून गिनीज बुकमध्ये आपले नाव नोंदवले होते.
चमचा बनवणे सोपे पण…
या रेकॉर्डच्या नियमांनुसार लाकडाच्या अनेक तुकड्यांपासून चमचा बनवता येतो. पण शशिकांतने चाकू आणि सर्जिकल ब्लेडचा वापर करून लाकडाच्या एका तुकड्यातच सर्वात लहान चमचा बनवण्याचा अनोखा विक्रम केला आहे. शशिकांत म्हणाला, “लाकडापासून चमचा बनवणे खूप सोपे आहे, परंतु जगातील सर्वात लहान लाकडी चमचा बनवणे खूप अवघड काम होते.”
अनेकवेळा अयशस्वी झालो पण…
शशिकांतने चमचा बनवण्यासाठी खूप प्रयत्न केले, त्यानंतर तो हा सर्वात लहान चमचा बनवू शकला जो इतरांचे विक्रम मोडणारा ठरला. त्याने सांगितलं की, अनेक वेळा चमचा पूर्णपणे तयार झाल्यानंतर तुटायचा, त्यामुळे अनेक वेळा मला अपयश आले पण शेवटी जिद्दीने मी तो चमचा तयार केलाच. शशिकांतच्या नावावर विक्रमाची नोंद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०२० मध्ये त्याने पेन्सिल शिशापासून सर्वाधिक साखळी लिंक बनवून प्रथम गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले होते. नंतर त्याने स्वतःच त्याचा विक्रम २०२१ मोडला होता.
शशिकांतच्या आधी राजस्थानच्या जयपूर येथील नवरत्न प्रजापतीच्या नावावर या विक्रमाची नोंद होती. नवरत्नने २०२२ मध्ये २ मिमी (०.७ इंच) चा चमचा बनवला होता. आश्चर्याची बाब म्हणजे नवरत्न प्रजापती याने लघुकलेचे कोणतेही प्रशिक्षण घेतले नव्हते, त्याने केवळ यूट्यूबवरील व्हिडिओ बघून त्याने ही कला आत्मसात केली होती.