Bike Robbery Viral Video : चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. चोर इतके हुशार झालेत की, ते बाईक हँडल लॉक केलेले असतानाही काही ना काही जुगाड करून ते चोरी करतात. अनेक कंपन्या आपल्या बाइक्सची चोरी होऊ नये म्हणून अनेक फीचर्स त्या त्या बाईकसोबत जोडताना दिसतात. पण तरीदेखील चोर अतिशय हुशारीने अवघ्या सेकंदभरात लॉक तोडून बाईकची चोरी करून पसार होतात. अशा प्रकारच्या घटनांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात चोराने घराबाहेर पार्क केलेल्या बुलेट बाईकचे अवघ्या सेकंदभरात लॉक तोडून ती लंपास केली. ही संपूर्ण घटना जवळील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडीओ पाहून खरंच तुम्हीदेखील अवाक् व्हाल.

कसे तोडले बाईकचे लॉक?

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेच्या व्हिडीओत चोर अवघ्या सेकंदभरात बुलेट चोरी करून पळताना दिसतोय. यावेळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोराचा चेहरा स्पष्ट दिसतोय. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, रस्त्याच्या कडेला मोठ्या संख्येने बाइक्स पार्क केल्या आहेत. यावेळी एक चोर थेट बुलेटजवळ येतो आणि कोणत्या तरी वस्तूच्या मदतीने काही सेकंदभरात बुलेटचे लॉक तोडतो. त्यानंतर बुलेट चालू करून तो पलायन करतो.

या प्रकरणी पीडित तरुणाने सांगितले की, चोरांनी त्याच्या कष्टाचे पैसे एका क्षणात पळवून नेले. पोलिसांनी या प्रकरणी तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. पण, अशा प्रकारे बाईक चोरी करण्याची ही पहिलीच घटना नाही, तर अशा चोरीच्या अनेक घटना सध्या घडत आहेत. त्यामुळे चोरांना कायद्याची काही भीती आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, अनेकांनी या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, फक्त १५ सेकंदांत लॉक तोडून बुलेटची चोरी केली गेली, हे अतिशय धक्कादायक आहे. दोन ते तीन लाख रुपयांची बाईक इतकी असुरक्षित असावी, ही खरोखरच चिंताजनक बाब आहे. दुसऱ्या एकाने लिहिलेय की, पगार वाढवण्यासाठी कौशल्य लागतं आणि या चोरांकडे ते कौशल्य नक्कीच आहे.