नाताळाच्या सणांत सिक्रेट सांता हा खेळ तसा खूप प्रसिद्ध आहे. आपल्या ओळखीतल्या कोणत्याही व्यक्तीला ओळख लपवून भेटवस्तू पाठवायच्या असा हा खेळ. या खेळामुळे बिल गेट्स चर्चेत आले आहे. त्यांनी एका महिलेला सिक्रेट सांता बनून भेटवस्तू पाठवल्या. जगातील सर्वात श्रींमत व्यक्ती आणि खुद्द मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्सने आपल्याला भेटवस्तू पाठवल्या हे जेव्हा या महिलेला समजले तेव्हा तिला किती आनंद झाला असेल याची कल्पना तुम्ही करू शकता.
रेडिट या साईटवर एरिक्स या ३० वर्षीय महिलेने एक गोष्ट लिहिली होती. आतापर्यंत सिक्रेट सांताबद्दल आलेल्या एकंदर वाईट अनुभवावर आधारित ती गोष्ट होती. बिल गेट्स यांनी ती गोष्ट वाचली आणि या महिलेला त्यांनी शोधून काढले. तिचा सिक्रेट सांता बनून त्यांनी तिला भेटवस्तू दिल्या. ही गोष्ट जेव्हा एरिक्सला समजली तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. मोठ्या बॉक्समध्ये बिल यांनी एरिक्साठी व्हिडिओ गेम्स पाठवले होते. भेटवस्तूंची ही यादी इथेच संपली नाही तर त्यांनी तिला लुसिनियन पाककृतीचे पुस्तकही पाठवले. यात बिल यांनी एरिक्ससाठी पत्रही लिहिले होते. तसेच बिल यांनी आपल्या आवडीच्या तीन चित्रपटांच्या सीडीही एरिक्सला पाठवल्या. या सगळ्या भेटवस्तू तर एरिक्ससाठी आनंद देणा-या होत्याच पण त्याहून तिला आनंद देऊन गेला तो बिल यांनी पाठवलेली फोटो फ्रेम. यात एरिक्स तिचे पती आणि तिच्या कुत्र्यासोबत बिल यांनी आपला फोटो देखील फोटोशॉप करून लावला. या फ्रेमवर त्यांनी एक छोटासा संदेशही लिहिला होता. एरिक्सने हे सारे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले.
वाचा : येथे होते ख्रिसमस ट्रीची शेती
आपल्या सिक्रेट सांताकडून येणा-या भेटवस्तू नेहमीच आनंद देतात. पण चक्क जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तीकडून अनपेक्षितरित्या आलेली भेटवस्तू एरिक्ससाठी आतापर्यंत मिळालेली आठवणीत राहिल अशी भेटवस्तू ठरली असेल हे नक्की.