बिल गेट्स हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक असलेल्या बिल गेट्सनं आतापर्यंत अनेक सामाजिक कार्यासाठी सढळहस्ते निधी दिला आहे. या व्यक्तीचं साधं राहणीमान अनेकांना आपल्याकडे आकर्षित करतं. त्यांचा एक फोटो सध्या वाऱ्याच्या वेगानं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्याच्या पायाशी लक्ष्मी लोळण घालते असा अब्जाधीश चक्क एका बर्गरसाठी सर्वसामान्यांप्रमाणेच रांगेत उभा असलेला या फोटोत दिसत आहे.
‘डिक्’चा बर्गर बिल यांचा सर्वात आवडता बर्गर आहे. त्यामुळे या बर्गर चेन स्टॉल बाहेर सामान्य ग्राहकांसारखीच रांग लावत बिल यांनी बर्गर आणि कोक खरेदी केलं. मायक्रोसॉफ्ट कंपनीत काम करणाऱ्या एका माजी कर्मचाऱ्यानं बिल गेट्स यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला त्यानंतर हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.
जगातील सर्व सुखसुविधा असलेल्या या अब्जाधीशाचे हे साधं राहणीमान अनेकांना भावलं. श्रीमंतीच्या गर्वानं नियम मोडणारे अनेक धनिक देशोदेशी आहेत मात्र अनुकरण करावं तर बिलचं गेट्स यांच अशा शब्दात अनेकांनी सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.