birdev done upsc: खांद्यावर घोंगडे, डोक्यावर टोपी, पाणी पिण्यासाठी लोकरीचा काचोळा काखेत मारून पायात जाडजूड पायतान, मेंढ्या चारण्यासाठी रानोमाळ भटकंती, वर आभाळ…खाली धरती हेच आपले घर माणून जीवन कंठणाऱ्या एका मेंढपाळाच्या मुलाने अथक प्रयत्नातून आयपीएस अधिकारी होण्यापर्यंत मजल मारली आहे. मेंढरं राखणारा पोरगा आता सायब झाला म्हणत अख्या महाराष्ट्रानं त्याला अक्षरश: डोक्यावर घेतलंय. दोन प्रयत्नात अपयश आलं मात्र जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक अभ्यासाच्या बळावर कोल्हापुरातील कागल तालुक्यातील यमगे गावचा बिरदेव ढोणेनं यूपीएससीचं मैदान मारलं आहे.यावेळी त्याचं गावात स्वागत करण्यात आलं असून यावेळी त्याच्या बहिणीबरोबरच अख्ख गाव भावूक झालेलं पाहायला मिळालं. कित्येक पिढ्यांचं दुख: बिरदेव ढोणे यांनं आपल्या यशातून संपवलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल.
वडील मेंढपाळ, घरात कसलीही सुविधा नाही, शिक्षणाचं वातावरण तर दूरची गोष्ट. पण त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक. पहिल्यापासूनच अधिकारी होणाचे स्वप्न होते अन् अखेर बिरदेव सिध्दाप्पा डोणे या मेंढपाळाच्या मुलाने ते पुर्ण केले. बिरदेव यांनी संघर्षातून घेतलेली ही झेप समाजापुढे प्रेरणादायी ठरणार आहे. निकाल लागताच केलेल्या कौतुकाचा सत्काराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल.
पाहा व्हिडीओ
अपमानाचा प्रत्येकालाच सामना कधी ना कधी करावा लागतो. कधी आपली चूक नसताना तर कधी आपली चूक झाली म्हणून अपमान सहन करावा लागतो. त्या क्षणी जरी अपमान गिळत असलो तरी झालेला अपमान कुणीही विसरत नाही. काही जण चुकीच्या मार्गाने याचा बदला घेतात, मात्र यश संपादन करणं हाच सगळ्यात मोठा बदला आहे; हे तर साऱ्यांनाच मान्य असेल. मात्र, फार कमी लोक असे असतात जे आपल्या यशातून अपमानाचा वचपा काढतात. याप्रमाणेच कोल्हापूरच्या युपीएससी (UPSC) क्रॅक केलेल्या बिरदेव डोणेची कथा आहे. ज्या बिरदेव ढोणेची पोलिसांनी साधी तक्रारही घेतली नाही, तो बिरदेव डोणे आज आयपीएस अधिकारी बनलाय.
फोन चोरीला गेला, पोलिसांना भावच नाही दिला
युपीएससीची मुलाखत दिल्यानंतर ज्ञानप्रबोधिनी येथील अभ्यास केंद्रावरुन जात असताना रात्री 11 वाजता राधिका भेळ येथून माझा फोन चोरीला गेला. माझा फोन चोरीला गेला ही गोष्ट मी अद्यापही घरी सांगितली नाही. घरी सांगितलंय की माझा फोन बंद पडलाय. पण खरं तर माझा फोन चोरीला गेलाय. त्यामुळे, आजही माझ्या बीडच्या मित्राचा फोन मी वापरत आहे, असे बिरदेवने सांगितले. तसेच, फोन चोरीला गेल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, तेव्हा त्यांनी आम्हाला भावच नाही दिला, माझी तक्रारही घेतली नाही, असे बिरदेवने एका मुलाखतीत बोलताना सांगितले.
निकाल लागला तेव्हाही तो मेढ्याच चरत होता
कोल्हापुरातल्या एका मेंढपाळाच्या मुलाने युपीएससी क्रॅक करुन लाखो गरिब, वंचित आणि सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांपुढे आदर्श निर्माण केलाय. गावखेड्यातील विद्यार्थ्यांच्या आशेचा किरण तो बनलाय. बिरदेव सिद्धापा ढोणे असं त्याचं नाव असून यूपीएससी परीक्षेत त्याने देशात 551 वा क्रमांक मिळवला. विशेष म्हणजे निकाल लागल्यानंतर तो बेळगावमधील अथणीमध्ये मेंढ्या घेऊन गेला होता. वाड्या-वस्त्यावर, माळरानावर जाऊन शिकलेला बिरदेव आता देशसेवत आपलं योगदान देणार आहे. त्याच्या या निवडीनंतर सर्वच स्तरातून त्याचा सत्कार, सन्मान केला जात आहे. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशीच संघर्षगाथा बिरदेवची आहे.