जी लोकं नियमित व्यायाम करतात, जिमला जातात, ते सगळे अंडं हे शरीरासाठी किती पोषक असतं आणि त्याचे किती फायदे असतात हे सतत सांगत असतात. व्यायाम करणारी प्रत्येक व्यक्ती आपल्या आहारात शिजवलेल्या अंड्याचा समावेश करत असते, तर काही जणं कच्ची अंडी खाणंदेखील पसंत करतात. पण, अंडी खायची म्हणून कितीही खाऊन चालत नाही. शरीराला आवश्यक असणारे पोषण मिळवून देण्यासाठी दिवसात किती अंडी खायची, याचं एक प्रमाण व्यायाम करणाऱ्या व्यक्तीकडे असते. पण, सध्या व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये एका इन्फ्लुएन्सरने १० नाही, २० नाही; तर चक्क १०० कच्ची अंडी गटागट प्यायल्याचे आपल्याला बघायला मिळते. विन्स आयनॉन [@vince iannone] नावाच्या एका युट्युबर आणि फिटनेस उत्साही मनुष्याने, त्याचे १००K फॉलोवर्स पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी हा प्रकार केला आहे.
या व्हिडीओमध्ये विन्स आयनॉन जिममध्ये १०० अंडी फोडून, त्या कच्च्या अंड्याच्या बल्कचा जग घेऊन उभा असल्याचे दिसत असून, तो हे काय आणि का करत आहे हे सांगतो आहे. त्याचं बोलून झाल्यानंतर १०० कच्च्या अंड्याच्या बल्कने भरलेला तो जग आपल्या ओठांना लावून गटागट पिण्यास सुरुवात केली. जग अर्धा रिकामा झाल्यानंतर त्याने काही सेकंद थांबून पुन्हा पिण्यास सुरुवात केली. तो संपूर्ण जग जवळपास संपत असतानाच, विन्स प्यायलेल्या अंड्यांचा बल्क बाहेर काढतोय की काय, असे वाटत असतानाच त्याने त्या फोडलेल्या १०० कच्च्या अंड्यांच्या बल्कचा जग संपवला.
हेही वाचा : जोडप्याने पैसे परत मिळावे म्हणून चक्क अन्नात आपलेच केस घातले! रेस्टॉरंटने शेअर केलेला हा व्हायरल Video पाहा.
या व्हिडीओमध्ये त्याने एकदा अंड्यांचा बल्क पितापिता मध्येच तो जग बाजूला ठेवून, तीन-चार पुशअप केले आणि पुन्हा एकदा जग उचलून पिण्यास सुरुवात केली. विन्स आयनॉन याने आपल्या इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील, @Vince_aesthetic नावाच्या हँडलवरून हा व्हिडीओ, “१०० अंडी थेट बायसेपपर्यंत जातील” अश्या कॅप्शनसह शेअर केला असून, या व्हायरल व्हिडीओला दोन मिलियन्स इतके व्ह्यूज मिळाले आहेत.
पण, व्हिडीओ जरी व्हायरल झाला असला तरीही यावर नेटकरी मात्र फारसे खुश दिसत नाहीयेत, असे त्या व्हिडीओवरील प्रतिक्रियांवरून दिसते.
या व्हिडीओवर आलेल्या काही प्रतिक्रिया पाहा :
“व्हिडीओ पूर्ण होताच याने बाथरूमकडे धूम ठोकली असेल”, अशी एकाने कमेंट केली. तर दुसऱ्याने, “हा भाऊ स्वतःच्याच हाताने स्वतःच्या जीवाशी खेळतोय”, अशी काळजी व्यक्त केली. तिसऱ्याने हा व्हिडीओ किती खरा आहे याबद्दल प्रश्न केला. “या व्हिडीओनंतर लगेच त्याने प्यायलेले सर्व बाहेर काढले असणार.” तर चौथ्याने “आजकाल लोकं काहीही मूर्खासारखं करायला लागले आहेत. आपलं शरीर एका वेळेला केवळ ३० ते ४० ग्रॅम इतकंच प्रोटीन पचवू शकतं”, अशी कमेंट केली आहे. तर शेवटी पाचव्याने, “मला टॉयलेटसाठी फार वाईट वाटत आहे”, अशी मिश्कील प्रतिक्रियादेखील दिलेली आहे.