राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उमेदवारांचे अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे देण्यावरून काँग्रेस आणि भाजपात शाब्दिक चकमक सुरू आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मोदींवर उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचा अर्ज दिल्यावरून टीका केली. तसेच उमेदवार कोण आहे, असा खोचक सवाल केला. याला भाजपानेही प्रत्युत्तर देत सोनिया गांधी यांचा एक जुना फोटो ट्वीट केला. तसेच जयराम रमेश यांना उमेदवार कोण आहे, असा प्रतिप्रश्न केला.

भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी जयराम रमेश यांना प्रत्युत्तर देत सोनिया गांधींचा एक फोटो ट्वीट केला. या फोटोत सोनिया गांधींसोबत माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, मुलायम सिंग, राहुल गांधी इत्यादी नेते दिसत आहेत. तसेच सोनिया गांधी निवडणूक अधिकाऱ्यांना उमेदवारी अर्ज देत असल्याचं दिसत आहे.

अमित मालवीय या ट्वीटमध्ये म्हणाले, “उमेदवार कोण आहे? जयराम रमेश काँग्रेसचे नवे नेते आहेत ज्यांनी स्वतःची दखल घ्यायला लावण्याच्या उत्साहात सोनिया गांधींना राबडी देवी म्हटलं. त्यांच्या या प्रयत्नाचा शेवट सुरजेवालांपेक्षा अधिक काँग्रेसचं नुकसान करून होईल.”

जयराम रमेश काय म्हणाले होते?

पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपाचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार जगदीश धनखड यांचा अर्ज भरण्यासाठी गेले होते. त्यावेळचा एक व्हिडीओ रिट्वीट करत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी उमेदवार कोण? असा खोचक प्रश्न विचारला.

याआधीही मोदींनी राष्ट्रपतीपदाच्या भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा उमेदवारी अर्ज भरताना हजेरी लावली होती. त्यावेळीही मोदींवर उमेदवाराचा अर्ज स्वतः दिल्याचा आरोप करत टीका झाली होती.

मालवीय यांच्या ट्वीटवर काँग्रेस समर्थक व भाजपा समर्थक आमनेसामने

अमित मालवीय यांच्या या ट्वीटवर काँग्रेस-भाजपा समर्थक आमनेसामने आलेत. भाजपा समर्थकांनी हे ट्वीट रिट्वीट करत जयराम रमेश व काँग्रेसवर टीका केली.

दुसरीकडे काँग्रेस समर्थकांनी अमित मालवीय यांचा दावा खोटा असल्याचं म्हणत तत्कालीन उपराष्ट्रपतीपदाचे काँग्रेस उमदेवार हमीद अन्सारी यांचा जुना फोटो ट्वीट केला आहे.

काही काँग्रेस समर्थकांनी, तर हमीद अन्सारी यांचा आणि आत्ताचा मोदींचा व्हिडीओ ट्वीट करत भाजपावर टीका केली.

एकूणच उमेदवारांचे अर्ज देण्यावरून काँग्रेस व भाजपात जुंपली आहे. दोन्ही पक्षांचे समर्थक एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत.

Story img Loader