मध्य प्रदेशमधील मुरैना जिल्ह्यातील जौरा मतदारसंघामधील भाजपाचे आमदार सुबेदार सिंह राजौधा यांनी लोकांना वीजचोरी करण्याचा सल्ला दिलाय. तुम्ही लोक आकडा टाकून वीज वापरा, वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे आम्ही पाहून घेऊ, असं राजौधा म्हणाले आहेत. सध्या त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होतोय, हा सारा प्रकार शुक्रवारी म्हणजेच ९ जुलै रोजी घडलेला असला तरी त्याचा व्हिडीओ आता व्हायरल झालाय.
राजौधा हे कैलारस येथील चंबल कॉलिनीमधील आपल्या कार्यालयामध्ये आले होते. येथे लोकांच्या तक्रार निवारणासंदर्भातील जनसुनावणी सुरु होती. त्यावेळी स्थानिकांनी वीजेच्या समस्येसंदर्भात आमदारांना सांगितलं. पिण्याच्या पाण्यासाठी आम्हाला आकडा टाकून मोटर चालवावी लागते, असं स्थानिकांनी आमदारांना सांगितलं. मात्र अशापद्धतीने आकडा टाकून वीज वापरताना अनेकदा वीज मंडळाचे कर्मचारी आमच्यावर कारवाई करतात आणि अशाप्रकारे मोटर चालवू देत नाहीत, अशी तक्रार स्थानिकांनी केली.
स्थानिकांची तक्रार ऐकून घेतल्यानंतर रजौधर यांनी, “तुम्ही वीज कर्मचाऱ्यांची चिंता करु नका, मी त्यांना पाहून घेईन. तुम्ही मोटर चालवा,” असं उत्तर दिलं. विशेष म्हणजे हा व्हिडीओ रजौधर यांनी आपल्या फेसबुक पेजवरही अपलोड केला होता.
यासंदर्भात बोलताना राजौधा यांनी जनतेच्या हितासाठी मला काहीही मंजूर असल्याचं सांगत आपल्या वक्त्याचं समर्थन केलं. मी जनताच्या हिताचच वक्तव्य केलेलं. लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागतोय तर आम्ही काय करावं?, त्यांनी विचारलं आकडा टाकून मोटर चालवावी का तर त्यावर मी हो म्हणालो, असं राजधौरा म्हणालेत. मुरैना जिल्ह्यातील जौरा मतदारसंघामध्ये वीजेची मोठी समस्या आहेत. राजौधा यांच्या फेसबुक पेजवरही त्यांनी अनेकदा वीजेसंदर्भात केलेल्या वेगवेगळ्या मागण्याच्या बातम्या पोस्ट केल्याचं पहायला मिळतं.
यावरुन माजी मुख्यमंत्री आणि राज्य सभेचे खासदार दिग्विजय सिंह यांनीही टीका केलीय. “भाजपाचे आमदार चोरी करण्याची शिकवण देत आहेत. जेव्हा ही लोकं चोरी करताना पकडली जातील तेव्हा त्यांना हजारो, लाखो रुपयांचं बिल भरावं लागेल त्यावेळी त्यांना वाचवण्यासाठी, त्यांचं वीज बिल भरण्यासाठी आमदार येणार का?,” असा प्रश्न दिग्विजय सिंह यांनी ट्विटरवरुन उपस्थित केलाय.
यासंदर्भात पिपल्स समचारशी बोलताना वीज विभागाचे अधिकारी पी. के. शर्मा यांनी, आमदार काहीही म्हणाले असतील तर जे लोक बेकायदेशीरपणे वीज चोरी किंवा मोटर चालवताना आढळून येतील त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल, असं सांगितलं.