माजी केंद्रीय मंत्री आणि सुल्तानपूरच्या खासदार मनेका गांधी यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत मनेका गांधी या गाढविणीच्या दुधापासून तयार करण्यात येणाऱ्या साबणाविषयी बोलत आहेत. यासाठी त्यांनी क्लिओपात्राचंही उदाहरण दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हटलं आहे मनेका गांधी यांनी?

“गाढविणीच्या दुधापासून तयार करण्यात आलेल्या साबणामुळे स्त्रीचं सौंदर्य अबाधित राहतं. इतिहासातली एक प्रसिद्ध राणी होऊन गेली.. तिचं नाव होतं क्लिओपात्रा. क्लिओपात्रा गाढविणीच्या दुधाने अंघोळ करत होती. दिल्लीत गाढविणीच्या दुधापासून तयार करण्यात आलेला साबण ५०० रूपयांना विकला जातो. असं असतानाही आपण बकरीच्या दुधापासून किंवा गाढविणीच्या दुधापासून साबण का तयार करत नाही?” असा प्रश्न मनेका गांधी यांनी मंचावरून विचारला आहे.

गाढवांची संख्या कमी होऊ लागली आहे

तसंच पुढे त्या म्हणाल्या की सध्या गाढवांची संख्या कमी झाली आहे. धोबीही कपडे वाहून नेण्यासाठी गाढवांचा वापर करत नाहीत. लडाखमध्ये एक समुदाय आहे ज्यांनी हे निरीक्षण नोंदवलं की गाढवांची संख्या कमी होते आहे. त्यामुळे त्यांनी गाढविणीच्या दुधापासून साबण तयार करण्यास सुरूवात केली. गाढविणीच्या दुधापासून तयार केलेल्या साबणाने अंघोळ केल्यास स्त्रीचं शरीर कायम सुंदर राहतं. ती दीर्घकाळ सुंदर दिसते या आशयाचं वक्तव्य मनेका गांधी यांनी केलं आहे.

मनेका गांधी गाढविणीच्या दुधाचं महत्त्व सांगून त्यापासून साबणाची निर्मिती करण्याचं आवाहन करत आहेत. हा व्हीडिओ सुल्तानपूरच्या बल्दीराय आयोजित एका कार्यक्रमात आहे. सध्या झाडं गायब होताना दिसत आहे त्यामुळे लाकडं महाग झाली आहेत. गरीबाच्या घरात मृत्यू झाला तर लाकडांचाही बराच खर्च होतो. त्यापेक्षा शेणापासून गोवऱ्या थापा, त्या साठवा. गोवऱ्यांच्या सहाय्याने अंत्यसंस्कार करा असाही सल्ला मनेका गांधी यांनी दिला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mp maneka gandhi says donkey milk soap keeps woman body beautiful video viral scj