न्यूज चॅनेलमध्ये काम करणं म्हणावं तेवढं सोप्प नक्कीच नसतं. इथे शंभर आव्हानांना एकाचवेळी तोंड द्यावं लागतं. त्यातून चालू कार्यक्रमात तर अँकरचा सगळा कस पणाला लागतो. एकतर लाखो लोक कार्यक्रम पाहत असतात तेव्हा कधी कोणतं आव्हान समोर येईल हे सांगता येत नाही. तुम्हाला तुर्कस्थानमधला एक किस्सा नक्कीच आठवत असेल. चालू कार्यक्रमादरम्यान अँकरच्या लॅपटॉपवर मांजर येऊन बसली होती. या मांजरीला बाजूला करणं आणि त्याचवेळी बातम्या वाचून दाखवणं ही दोन्ही कामं करता करता अँकरची तारांबळ उडाली होती. शेवटी बिचाऱ्याने कसंबसं आपलं बातमीपत्र संपवलं होतं. याची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती, आता असाच प्रकार रशिमध्येही घडला.

इथे चालू कार्यक्रमात ‘स्पेशल गेस्ट’ म्हणून चक्क कुत्र्यानेच एण्ट्री घेतली. आता बिचाऱ्या अँकरला आपल्या मागे काय सुरूय हे माहिती नव्हतं तोपर्यंत ठिक होतं. पण नंतर मात्र चालू कार्यक्रमात कुत्रा शिरल्याचं तिच्या लक्षात आलं आणि तिची चांगलीच भंबेरी उडाली. इथे झुरळ दिसलं तरी मुलींना धडकी भरते तिथे बाजूला कुत्रा पाहिल्यावर तिची काय स्थिती झाली असेल हे वेगळं सांगायला नको. पण शेवटी काम ते.. आता एका कुत्र्याला घाबरून पळून कसं जायचं? तेव्हा घाबरत घाबरत का होईना तिने आपलं बातमीपत्र पूर्ण केलं.

Story img Loader