असं म्हणतात की आपण करत असलेली मेहनत आणि त्याग कधीही वाया जात नाही. एकदा कोणती गोष्ट मनापासून करायची ठरली तर ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी मग कितीही अडचणी आल्या तरी आपला संयम मात्र सुटला नाही पाहिजे. एखादं काम करताना थोड्या जरी गोष्टी बिघडल्या की आपण नकारात्मक होतो आणि पुन्हा ती गोष्ट पूर्ण करण्याच्या नादात लागतही नाही. पण सध्या सोशल मीडियावर होत असलेल्या एका आजोबांचा व्हिडीओ अशाच लोकांना लाजवणारा ठरलाय.

सोशल मीडियावर एक अतिशय प्रेरणादायी व्हिडीओ व्हायरल होत आहे. नाशिकमध्ये केळीचे चिप्स विकणाऱ्या या व्हायरल आजोबांनी सर्वाचंच लक्ष वेधून घेतलंय. आपल्या शरीराला थोडी जरी जखम झाली किंवा हात पाय दुखू लागले की आपण पडून राहतो. पण काम करता करता डोळे गमावून बसलेल्या आजोबांचा हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्ही त्यांच्या कामगिरीला सलाम केल्याशिवाय राहणार नाहीत, हे मात्र नक्की. कुठलीही असाध्य गोष्ट साध्य करण्यासाठी कुठलंही शारीरिक व्यंग आड येत नाही, ही गोष्ट डोळ्याने अंध असलेल्या या नाशिकमधल्या आजोबांनी साध्य करून दाखवली आहे.

नाशिकमध्ये केळीचे चिप्स विक्रीचं काम करणाऱ्या या आजोबांना अंध असा उल्लेख करून त्यांचा अपमान करावासा वाटत नाही. कारण त्यांनी ते साध्य करून दाखवले आहे जे शरीर स्वस्थ असूनसुद्धा करु शकत नाहीत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एका रस्त्याच्या कडेला हे अंध आजोबा केळीचे चिप्स विकताना दिसून येत आहेत. वयाच्या ८० व्या वर्षी देखील या आजोबांची धडपड आजच्या तरूणांना लाजवणारी आहे. नाशिकच्या मखमलाबाद रोडवर हे अंध आजोबा केळीचे चिप्स विकतात. डोळ्याने अंध असले तरी मोठ्या हुशारीने ते केळीचे काप कापून तेलात तळताना दिसून येत आहेत. केळीचे चिप्स बनवण्याची त्यांची हटके स्टाईल पाहून पाहणारे केवळ पाहतच राहतील. अंध असूनही हे आजोबा आपल्या हाताने आपलं पोट भागवण्यासाठी त्याच जोशाने उभे आहेत हे एका उदाहरणापेक्षा कमी नाही.

हे आजोबा फार वर्षापूर्वीपासून केळीचे चिप्स विकण्याचं काम करत आहेत. केळीचे चिप्स तेलात तळत असताना येणाऱ्या गरम वाफेमुळे आणि उष्णतेमुळे त्यांनी आपले डोळे गमावले होते. पण कौतुक करण्यासारखं म्हणजे आपण अंध झालो म्हणून दुसऱ्या कुणावर अवलंबून न राहता पुन्हा त्याच जोशाने आपलं बंद पडलेलं काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. डोळ्याने दिसत नसलं तरी गेल्या अनेक वर्षापासून केळीचे चिप्स बनवण्याचं काम करत आल्यामुळे त्यांचा हात पुरेपुर बसला होता आणि त्यामूळे त्यांच्या या कामात त्यांचं अंधत्व आड आलं नाही. याच कामामुळे त्यांचे डोळे गेले तरी त्यांनी नोकरी सोडली नाही. त्याच जिद्दीने ते केळीचे चिप्स विकण्यासाठी मोठ्या उमेदीने उभे आहेत.

डोळे नसतानाही इतक्या पटापट केळीचे चिप्स बनवणारे हे आजोबा पाहून नेटिझन्स आश्चर्यचकित होताना दिसून येत आहेत. लोकांच्या नजरा त्यांच्यावर खिळलेल्या आहेत. हा व्हिडीओ ‘संस्कार खेमानी’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत १३.३ मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिलंय. तसंच ८ लाख १२ हजार लोकांनी लाईक केलं आहे. अंध असूनही त्यांनी आयुष्यात निराशा येऊ दिली नाही. आजच्या युगात लोक निराशेतून बाहेर पडून आत्महत्येसारखे पाऊल उचलतात, अशा लोकांनी आजोबांकडून प्रेरणा घेतली पाहिजे.

Story img Loader