आपल्या घरातली एखादी किंमती वस्तू फुटली किंवा तिचं काही नुकसान झालं तर आपला संताप किंवा त्रागा होतो हा अनुभव सगळ्यांनीच घेतला असेल. पण एखाद्याच्या तब्बल ७ कोटी ४७ लाख रुपये किंमतीच्या सुंदर पेंटिंगवर कुणीतरी फक्त कंटाळा आला म्हणून बॉलपेननं काहीतरी खरडावं, याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो! कारण इतकी महागाची गोष्ट सामान्य व्यक्तीच्या घरात सापडणं म्हणजे अशक्यच! पण हा प्रकार वास्तवात घडला असून एका सुरक्षा रक्षकानं हा प्रताप केला आहे. सुरुवातीला कंटाळा आल्यामुळे त्यानं हे कृत्य केल्याचं म्हटलं जात होतं. आता त्यामागचं खरं कारण समोर आलं आहे.
रशियाच्या स्वेर्डलोव्हस्क ओब्लास्ट प्रांतामधील येल्ट्सीन भागात ७ डिसेंबर रोजी ही घटना घडली आहे. या भागात भरलेल्या एका चित्रप्रदर्शनामध्ये हे चित्र ठेवण्यात आलं होतं. अलेक्झांडर वॅसिलिएव्ह नावाचा ६३ वर्षांचा सुरक्षारक्षक या प्रदर्शनाबाहेर ड्युटीवर होता. अलेक्झांडरचा हा कामावरचा पहिलाच दिवस होता. आणि पहिल्याच दिवशी महाशयांनी ७ कोटी ४७ लाख रुपये किंमतीच्या एका चित्रावर चक्क बॉलपेननं डोळे काढले!
१९३२-३४ या कालावधीमध्ये हे चित्र अॅना लेपोर्स्काया नावाच्या सुप्रसिद्ध चित्रकाराने काढलं होतंत ‘थ्री फिगर्स’ असं या चित्राचं नाव आहे. या चित्रामध्ये तीन चेहरे दिसत असून त्यांना डोळे, कान, नाक, तोंड असे चेहऱ्याचे कोणतेही अवयव नाहीत.
“मला ते चित्र अजिबात आवडलं नव्हतं”
अलेक्झांडर हा निवृत्त लष्करी अधिकारी आहे. अलेक्झांडरला अटक करण्यात आली आहे. त्याने दिलेल्या कबुलीजबाबानुसार काही अल्पवयीन मुलींच्या सांगण्यावरून त्याने हे कृत्य केलं. “मी मूर्खच आहे की मी हे असं काहीतरी केलं. पण खरं सांगायचं तर मला ते चित्र अजिबात आवडलं नव्हतं. त्यामुळे फार नकारात्मक प्रभाव पडत होता. कामावर गेलो तेव्हा मी त्या चित्राकडे न पाहाता पुढे निघून जाण्याचाच प्रयत्न करत होतो”, असं अलेक्झांडर म्हणाला आहे.
“…त्या मुलींनी मला तसं सांगितलं”
“लोक ते चित्र पाहून कशा पद्धतीने प्रतिक्रिया देत होते हे मी पाहिलं होतं. मग मी काही अल्पवयीन मुली पाहिल्या. १६-१७ वर्षंच्या असतील. त्या तिथे उभ्या राहून चित्रातल्या तीन आकृत्यांना डोळे, तोंड, नाक असं काहीच का नाहीये, याविषयी चर्चा करत होत्या. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही इथे काम करता ना, मग त्या चित्राला डोळे काढा”, अशी माहिती अलेक्झांडरनं पोलिसांना दिल्याचं वृत्त स्थानिक वृत्तपत्रांनी दिलं आहे.
नेमकं तेव्हा काय घडलं?
“मला वाटलं ते चित्र त्या मुलींचंच आहे. मी त्यांना विचारलं, हे चित्र तुमचं आहे का? त्या म्हणाल्या हो. मग त्यांनी मला पेन दिलं. मी त्या चित्राला डोळे काढले. मला वाटलं की हे एक लहान मुलांनी काढलेलं चित्र आहे. लोक येता-जाता चित्र पाहून हसत असल्याचं मी पाहिलं”, असं देखील अलेक्झांडरनं सांगितलं.
दुरुस्तीचा खर्च अडीच लाख रुपये!
दरम्यान, या चित्राच्या दुरुस्तीचा खर्च तब्बल अडीच लाख रुपये येणार असल्याचं सांगितलं जात आहे. अलेक्झांडरनं बॉलपेननं डोळे काढताना फार जोर लावला नसल्यामुळे बॉलपेनची शाई काढता येऊ शकेल, अशी माहिती देण्यात आली आहे. दुरुस्तीचा संपूर्ण खर्च अलेक्झांडर ज्या खासगी सुरक्षा कंपनीसाठी काम करत होता, ती कंपनी देणार आहे. तसेच, अलेक्झांडरला कलाकृतीची नासधूस केल्याप्रकरणी ३९ हजार रुपये आणि एक वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा देखील सुनावण्यात आली आहे.