Viral video: सोशल मीडियावर रोज वेगवेळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी हसवणारे असतात तर कधी रडवणारे असतात. तर काही व्हिडीओ पाहून अवाक् व्हायल होतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तुम्ही आतापर्यंत महिलांची भांडणं बघितलीच असतील, कधी नळावर तर कधी लोकलमध्ये. बायका या कुठेही आणि कशावरूनही भांडू शकतात. दरम्यान यामध्ये त्या एकमेकिंना शिवीगाळही करतात. दरम्यान समोर आलेल्या व्हिडीओमध्ये महिलांचे दोन गट एकमेकिंवर शिव्यांचा अक्षरश: भडिमार करत आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू येईल. आता तुम्हाला वाटेल महिलांची ही नेहमी प्रमाणेच भांडणं असतील पण तसं नाहीये, ही एक परंपरा आहे.
आपल्याकडे गावोगावी अनोख्या प्रथा आणि परंपरा पूर्वापार चालत आलेल्या आहेत. नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी अशीच अनोखी परंपरा सातारा जिल्ह्यातील सुखेड-बोरी या गावात गेल्या २०० वर्षांपासून सुरू आहे. दोन्ही गावच्या महिला ओढ्याच्या काठी समोरा-समोर येतात आणि एकमेकींना तुफान शिवीगाळ करतात. हातवारे करून एकमेकींच्या अंगावर जाण्यापर्यंत प्रकरण जातं. दोन्ही गावच्या शेकडो महिलांमध्ये हा सामना रंगतो. यालाच बोरीचा बार असं देखील म्हटलं जातं.
दोन्ही गावांतील महिलांनी सनई हलगीच्या तालावर वाजत गाजत ओढ्यावर एकत्र येऊन एकमेकां कडे बघत हातवारे करून शिव्यांचा भडिमार करत बोरीचा बार अनोखी परंपरा कायम ठेवली . सुखेड व बोरी गावातील बोरीचा बार संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. या दिवशी दोन्ही गावांतील महिला एकत्र येऊन एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहतात. दोन्ही गावांच्या मधून वाहणाऱ्या ओढ्यावर समोरासमोर जमून दोन्ही बाजूकडील महिलांकडून एकमेकांना हातवारे करीत शिव्या दिल्या जातात.
पाहा व्हिडीओ
बोरीचा बार सुरू होताना दोन्ही गावातील महिला एकत्र येऊन ओढ्यावर शिव्यांची लाखोली वाहत असतात, त्यावेळी पुरुष मंडळी ओढ्याच्या मध्यभागी उभे राहून दोन्ही महिलांना एकमेकींपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करतात. श्रावणातल्या षष्ठीला हा बोरीचा बार साजरा होताना हलगी व सनईच्या सुरात महिलांना अधिकच चेव चढत होता. बार सुरू होण्यापूर्वी दोन्ही गावातील महिला ग्रामदैवताच्या मंदिरासमोर एकत्र आल्या. तेथून या महिला झिम्मा, फुगडी, फेर धरत ओढ्यापर्यंत जातात.महिला आपला पारंपरिक बार दरवर्षी न चुकता साजरा करतात.