Mumbai Preschool Asks Delivery Method Of Child In Form : कोणत्याही शाळेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्वात आधी एक अर्ज भरून द्यावा लागतो. जो वाचून, समजून घेतल्यानंतर शाळेकडून प्रवेशाची प्रक्रिया सुरू होते. या अर्जात विद्यार्थ्याचे नावा, पत्ता, वय आणि इतर काही सामान्य स्वरूपाची आवश्यक माहिती विचारली जाते. पण मुंबईतील एका शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश देताना अर्जाद्वारे पालकांना एक खासगी प्रश्न विचारण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यावर पालकांसह अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. स्टॅण्डअप कॉमेडियन श्रीधर व्ही. यांनी सोशल मीडियावर या अर्जाची एक पोस्ट केली आहे. त्यावर पालकांनी संबंधित शाळा प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. पण, त्या शाळेने पालकांना अर्जात असा नेमका कोणता प्रश्न विचारला ते आपण जाणून घेऊ.

शाळेने अर्जात नेमका कोणता प्रश्न विचारला?

स्टॅण्डअप कॉमेडियन श्रीधर व्ही. यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) एक फोटो शेअर केला आहे; जो मुंबईतल्या शाळेतील प्रवेश अर्जाचा फोटो असल्याचे समजतेय. या फोटोसह श्रीधर व्ही. यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, मुंबईतील शाळेत प्रवेश देताना काय विचारले जात आहे, ते पाहा. हे प्री-स्कूलसाठी आहे. या अर्जात शाळेने पालकांना आपल्या मुलाचा जन्म कसा झाला, असा प्रश्न विचारला आहे. या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी पालकांना अर्जात नॉर्मल, प्री-मॅच्युअर आणि सर्जरी, असे तीन पर्याय देण्यात आले आहेत.

मात्र, शाळेच्या या प्रश्नावर पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. कारण- प्रसूती हा विषय कोणत्याही पालकांसाठी एक खासगी विषय आहे. त्याचा मुलांच्या शिक्षणाशी काय संबंध, त्याचा काय परिणाम होणार? असे प्रश्न संतप्त पालकांकडून उपस्थित केले जात आहेत.

नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिकिया

मुंबईतील प्री-स्कूल प्रवेश अर्जात मुलाच्या प्रसूतीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाशी संबंधित पोस्ट आता सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल होत आहे. त्यावर लोकांनी खूप लाइक्स आणि एक हजारपेक्षा जास्त कमेंट्स केल्या आहेत. तसेच अनेक पालक आपल्याला आलेला अनुभव शेअर करीत आहेत. असाच अनुभव शेअर करताना, एका युजरने लिहिले आहे, “माझ्या एका मित्राने मला सांगितले की, त्याला त्याच्या मुलाच्या प्री-स्कूलमध्ये प्रवेश घेण्यासाठी शाळा प्राधिकरणाकडे CV पाठवावा लागला.हे फारच वाईट होते. दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, पण हा प्रश्न मुलाच्या शिक्षणात कुठे आडवा येतो? तिसऱ्या युजरने लिहिले की, शैक्षणिक संस्थांना त्यांच्या संस्थेतील मुलाचा जन्म कसा झाला, हे जाणून घेणे इतके महत्त्वाचे आहे का? असे अनेक प्रश्न आता संतप्त युजर्स उपस्थित करीत आहेत.

शाळेचे धक्कादायक नियम

श्रीधर व्ही. यांनी पुढे अशी माहिती दिली की, हा अर्ज फक्त मुलाच्या आईनेच भरावा, असे शाळेने सांगितले आहे. तसेच मुलाच्या मुलाखतीतही फक्त आईनेच उपस्थित राहावे, असा नियमही शाळेने सांगितला आहे.