करोना विषाणूविरोधात जीवाचा धोका पत्करुन लढणारे डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय स्टाफ, पोलीस आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी भारतभरात रविवारी टाळ्या आणि थाळ्या वाजवून आभार मानण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशाप्रकारे आभार मानण्याचे आवाहन जनतेला केलं होतं. या आवाहनाला जनतेने दमदार प्रतिसाद दिला. रविवारी संध्याकाळी बरोबर ५ वाजता ५ मिनिटांसाठी लोकांनी आपापल्या सोसायट्यांच्या परिसरात, गॅलरीमध्ये येऊन टाळ्या, घंटा आणि थाळ्या वाजवल्या. तसेच बच्चे कंपनीनेही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
निर्भया दोषींच्या फाशीआधी जल्लाद म्हणाला… “आधी फासावर लटकवतो, मग खाण्यापिण्याचं बघू”
पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाची अंमलबजावणी झाल्यानंतर सामान्य नागरिकांपासून ते नेतेमंडळींनी आपले व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. यात एका ट्विटने विशेष लक्ष वेधून घेतले. भारतीय बॉक्सर विजेंदर सिंग याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच त्यांच्या व्हिडीओबद्दल विचारले. “मोदीजी, तुम्ही आम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही मनापासून साऱ्यांचे आभार मानले. कृपया तुमचाही व्हिडीओ अपलोड करा. आम्हाला बघायचं आहे की तुम्ही घंटानाद करून आभार मानलेत की टाळ्यांच्या गजरात साऱ्यांचे कौतुक केलेत? मी काय केलं ते तर मी पोस्ट केलं आहेच”, असे ट्विट त्याने केले.
Sir @narendramodi plz upload your video also we want to see what u did at 5pm clap or regards you seen mine
— Vijender Singh (@boxervijender) March 22, 2020
CoronaVirus : टोक्यो ऑलिम्पिक लांबणीवर? दुहेरी दणक्यानंतर जपान नरमलं…
दरम्यान, देशासह राज्यातील जनतेनेही पंतप्रधानांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद दिला. मुंबई, पुणे, नाशिक इथून नागरिकांनी आपापल्या सोसायट्यांमध्ये टाळ्या वाजवून, थाळ्या वाजवून तसेच पुण्यात काही ठिकाणी लोकांनी फटाके वाजवून करोना योद्ध्यांचे आभार मानले.
मुंबईत महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील आपल्या कुटुंबियांसोबत बंगल्याच्या गच्चीवर जाऊन टाळ्या आणि घंट्या वाजवून पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीदेखील थाळी वाजवून यामध्ये सहभाग नोंदवला.