आपली आई दिवसरात्र घरात काम करत असते. सकाळी उठल्यापासून स्वयंपाकघरात चहा, नाश्ता, जेवण बनवण्यामध्ये व्यस्त असते. अनेक स्त्रिया आपले घर सांभाळून दिवसभर कामावरदेखील जातात आणि पुन्हा घरी येऊन घरी काम करत असतात. अशात त्यांना स्वतःसाठी अजिबात वेळ देता येत नाही. मात्र, आत्ताची बरीचशी तरुण मंडळी सुट्टीच्या दिवशी आपल्या आईला आराम मिळावा यासाठी घरातील लहानमोठी कामे करतात.
असाच विचार करून एका तरुणाने आपल्या आईसाठी स्वयंपाक बनवण्याचा विचार केला होता. मात्र, नशीब काही त्याच्या बाजूने नव्हते असे सोशल मीडियावर फिरणारा हा व्हिडीओ पाहून म्हणावे लागेल. भात शिजवून आईला खुश करायचे असा तरुणाचा खरंतर विचार होता. आता भात शिजवण्याचे दोन प्रकार असतात. एक पातेल्यामध्ये तर दुसरा कुकरमध्ये. तरुणाने यातील दुसरा पर्याय निवडला होता.
या मुलाने कुकरमध्ये भात शिजवण्यासाठी ठेवला होता. मात्र, काही कारणास्तव तो प्रेशर कुकर फुटला होता. त्यामुळे संपूर्ण स्वयंपाकघराची भयंकर अवस्था झाली असल्याचे सोशल मीडियावर शेअर झालेल्या व्हिडीओमधून आपल्याला पाहायला मिळते. यात कुकरचे झाकण प्रेशरमुळे उडून स्वयंपाकघरातील छतावर शब्दशः अडकून बसल्याचे आपल्याला दिसते. इतकेच नाही तर या कुकरमधील अर्धाअधिक भात ओटा, शेगडी, स्वयंपाकघरातील भिंत आणि छतावर उडालेला आहे.
आता हा सर्व प्रकार पाहून व्हिडीओ शूट करणाऱ्या तरुणालाही रडू आवरले नाही. कारण व्हिडीओमध्ये हुंदके देऊन रडण्याचा आवाज ऐकायला मिळतो आणि त्यासह, “भात शिजवून आईला सरप्राईज देणार होतो, पण प्लॅन थोडा फिस्कटला; आई काही बोलणार तर नाही ना?” असा भीतीयुक्त प्रश्न लिहिलेला आहे. या तुफान व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या पाहा.
“ते सगळं ठीक आहे, पण झाकण वर कसं चिकटलं?” असे एकाने विचारले आहे. दुसऱ्याने, “पृथ्वी सोड आता… तरच वाचण्याची शक्यता आहे.” अशी मिश्कील प्रतिक्रिया दिली आहे. तिसऱ्याने, “भावा चप्पल, झाडू, लाटणे सगळं लपवून ठेव बास” असे सुचवले आहे. चौथ्याने, “लवकर सगळी भांडी घासून, नवीन कुकर आणून आईला सरप्राईज दे” असे लिहिले आहे. तर शेवटी पाचव्याने, “अरे आई काही बोलणार नाही, उलट तुला प्रेमाने जवळ घेईल, तुला कुठे काही इजा नाही ना झाली ते आधी बघेल… मग सटकन पाठीत एक धपाटा घालून ‘हे नसते उद्योग कुणी करायला सांगितले होते?’ असा प्रश्न विचारेल” असे म्हटले आहे.
हेही वाचा : नाशिकची ‘Super woman’! गरम तेलात हात घालून तळत आहे ‘उलटा वडापाव’; व्हायरल व्हिडीओ पाहा.
इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @theaagrikolitales या अकाउंटने शेअर केलेल्या या व्हिडीओला आत्तापर्यंत ४७.४K इतके लाईक मिळाले आहेत.