अभिनेत्री रिचा चड्ढाने भारतीय लष्करी अधिकाऱ्यांच्या वक्तव्यावर केलेल्या ट्वीटवरुन मोठा वाद सुरु असतानाच रिचासंदर्भातील वेगवेगळ्या गोष्टींवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन ट्वीटरवरुन केलं जात आहे. असं असतानाच आधी ‘बॉयकॉट फुकरे ३’ ट्रेण्ड व्हायरल झाल्यानंतर आता ममाअर्थ या सौंदर्य प्रसादनांच्या कंपनीवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं जात आहे. ‘ममाअर्थ’ कंपनीने रिचाच्या विधानाला पाठिंबा दिल्याचा दावा अनेकांनी केला आहे. गलवानसंदर्भात रिचाने केलेल्या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना ‘ममाअर्थ’च्या ट्विटर हॅण्डलवरुन रिचाने केलेलं ट्वीट हे भारतीय लष्कराची शक्ती दाखवणारं असल्याच्या अर्थाने आपण घेऊ शकतं असं सांगण्यात आलेलं. चीन आणि भारतीय लष्कराच्या जवानांमध्ये झालेल्या संघर्षाचा संदर्भ देत रिचाने केलेल्या एका ट्वीटवरुन वाद झाल्यानंतर तिने बिनशर्थ माफी मागितली होती.
नेमकं घडलं काय?
भारतीय लष्करातील उत्तर विभागाचे लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना रिचाने केलेल्या ट्वीटमुळे वाद निर्माण झाला आहे. भारत सरकारने आदेश दिल्यास पाकव्याप्त काश्मीर भारताला जोडण्यासाठी भारतीय सैन्य तयार आहे, असं द्विवेदी म्हणाले होते. याच प्रतिक्रियेसंदर्भातील ट्वीट रिचाने रिट्वीट करत, “गलवान सेज हाय” म्हणजेच गलवान तुमच्याकडे पाहतंय अशा अर्थाची प्रतिक्रिया दिली होती. मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये द्विवेदी यांनी, “पाकव्याप्त काश्मीर भारताला जोडण्याबाबतचा प्रस्ताव संसदेत पाठवला आहे,” असा उल्लेख करत पाकिस्तान व्याप्त काश्मीरबद्दल विधान केलं. “हा संसदेतील प्रस्ताव एक भाग झाला, आता उरला प्रश्न भारतीय सैन्यांचा तर भारत सरकारने दिलेला कोणताही आदेश अमलात आणण्यासाठी भारतीय सैन्य तयार आहे. जेव्हा याबाबतचा आदेश दिला जाईल, तेव्हा आम्ही पूर्ण तयारीने पुढे जाऊ,” असं विधान उपेंद्र द्विवेदी यांनी पाकव्याप्त काश्मीरसंदर्भात बोलताना केलं.
याच विधानातील मजकुरासहीत द्विवेदी यांचा फोटो एका ट्विटर हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आला होता. हा फोटो रिट्वीट करत रिचाने, “गलवान सेज हाय” असं म्हटलं आहे. या ट्वीटवरुन बराच वाद निर्माण झाला आहे. अनेकांनी या ट्वीटवरुन रिचाला फटकारलं.
रिचाने या ट्वीटमधून भारतीय लष्कराची चेष्टा केल्याचा आरोप अनेकांनी या ट्वीटला रिप्लाय करताना केला आहे. २०२० मध्ये गलवानच्या खोऱ्यामध्ये चीनविरुद्ध झालेल्या संघर्षात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या हौतात्म्याचा हा अपमान आहे असं अनेकांनी म्हटलं. जून २०२० मध्ये गलवानमध्ये झालेल्या संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले होते. मागील ४० वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारत आणि चीनच्या लष्करामध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. यानंतर बराच मोठा वाद निर्माण झाला. वादानंतर रिचाने हे ट्वीट डिलीट केलं आणि माफी मागितली.
ममाअर्थने काय म्हटलं?
रिचाच्या या ट्वीट प्रकरणावरुन आधीच रिचाबद्दल संताप व्यक्त केला जात असतानाच भारतीय बनावटीच्या ‘ममाअर्थ’ कंपनीने केलेल्या एका ट्वीटमध्ये रिचाला समर्थन देणारं विधान केलं होतं. ‘गलवान सेस हाय’ याच्याकडे निर्णायक विधान म्हणून न पाहता त्याकडे दृष्टीकोन बद्दलून पाहिलं पाहिजे, अशा अर्थाचं ट्वीट करण्यात आलं होतं. यावरुनच आता अनेकांनी ममाअर्थ कंपनीला लक्ष्य करत त्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. एका युजरने, “ममाअर्थने हे ट्वीट डिलीट केलं. मी यापूर्वी माझ्या भाचीसाठी प्रोडक्ट मागवायचे मात्र आता मी ममाअर्थकडून प्रोडक्ट मागवणार नाही. माझ्या आजूबाजूच्या लोकांनाही या प्रोडक्टवर बहिष्कार टाकायला सांगाणार आहे. त्यांना या ट्वीटबद्दल काही आक्षेपार्ह वाटत नसेल तर आपण असं उत्तर द्यायला हवं,” असं म्हटलं आहे.
१) अनेकांनी ऑर्डर रद्द केल्या
२) काहींनी प्रोडक्ट फेकून दिले
३) तोपर्यंत बहिष्कार
४) …म्हणून रिचाची बाजू घेताय का?
५) तुमचे प्रोडक्ट वापरणार नाही
६) तिच्या म्हणण्याचा अर्थ वेगळा होता
७)
गलवानचा उल्लेख करत रिचाने केलेल्या या पोस्टच्या संदर्भात अनेक ठिकाणी तिच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.