Mumbai Rains Local Train Delay Viral Memes: मुंबईत ७ जुलैच्या रात्री झालेल्या तुफान पावसामुळे आज ८ जुलैच्या सकाळपासूनच मुंबईकरांची दैना झाली आहे. मध्य रेल्वेच्या काही स्थानकांमध्ये ट्रॅकवर पाणी साचून लोकल सेवा ठप्प झाल्या आहेत तर रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे खासगी वाहनाने, बसने प्रवास करणे सुद्धा कठीण झाले आहे. आपणही सकाळपासून मुंबईच्या पावसाचं रौद्र रूप व परिणाम दाखवणारे व्हिडीओ, फोटो पाहिले असतीलच. जेव्हा जेव्हा मुंबईत असा जोरदार पाऊस होतो तेव्हा लोकलच्या स्थितीचे अपडेट्स मिळवण्यासाठी प्रवासी आपोआपच एम इंडिकेटरकडे वळतात. प्रवासात अडकून पडलेले किंवा स्थानकावर गर्दीत उभे असणारे प्रवासी इथे आपल्या तक्रारी तसेच लोकलच्या वेळेचे अपडेट्स शेअर करत असतात. आपण कधी हे चॅट्स वाचले असतील तर आपल्याला नक्कीच माहित असेल की इथे १० पैकी १ जण तरी असा नक्कीच असतो जो असा काही मेसेज टाकतो ज्यामुळे गंभीर स्थितीतही इतर प्रवाशांना हसू आवरता येत नाही. आता सुद्धा असाच एक मेसेज स्क्रिनशॉट स्वरूपात ऑनलाईन व्हायरल होतोय. नेमकं असं या मेसेजमध्ये म्हटलंय काय हे पाहूया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तर झालं असं की, X वर एका युजरने एम- इंडिकेटरच्या चॅटबॉक्समधील मेसेजचा स्क्रिनशॉट काढून शेअर केला आहे. आज, ८ जुलैला सकाळी ७ वाजून ४२ मिनिटांनी हा मेसेज एका तरुणाने एम- इंडिकेटरच्या चॅटमध्ये केला होता. युजरने हा स्क्रिनशॉट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “मुंबईचा पाऊस हा नेहमीच रोमँटिक नसतो हे पटवून देणारा पुरावा”. साधारण कॅप्शनवरून आधी असं वाटतं की पावसामुळे एखाद्या गंभीर स्थितीत अडकलेल्या कुणाविषयी ही पोस्ट असेल पण मुद्दा काहीतरी भलताच असतो.

एका तरुणाने या चॅटमध्ये लिहिलेले असते की, “अरे यार माझं लॉन्ग डिस्टन्स (रिलेशनशिप) आहे. आज आम्ही भेटणार होतो. ती नागपूरवरून कसाऱ्याला येणार होती आणि कांदिवलीवरून, आता ट्रेन बंद झाल्यावर आम्ही कसे भेटणार.”

दरम्यान, हा मेसेज पाहून काहींनी कमेंट करत, “अरे भाई इथे कुणाचं काय, तर कुणाचं काय” असं म्हटलंय तर अनेकांनी बिचाऱ्या प्रियकराच्या भावना समजून घेत त्याला न्याय मिळवून द्या अशी मागणी रेल्वेकडे केली आहे. काही का असेना सकाळपासून पाऊस, उशिराने धावणाऱ्या ट्रेन, प्रचंड गर्दी व वेळेचा खोळंबा यात या तरुणाचा एक मेसेज निदान काहींच्या तरी चेहऱ्यावर हसू आणतोय.

हे ही वाचा<< Mumbai Rains : मुंबईत मुसळधार का ?

गंमतीचा भाग सोडला तर, सध्या मध्य व ट्रान्स हार्बरवरील लोकल उशिराने धावत आहेत. काही ठिकाणी तर लोकलसहित लांब पल्ल्याच्या गाड्या सुद्धा रद्द करण्यात आल्या आहेत. गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. आज दिवसभरात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता आहे. पावसाशी संबंधित अपडेट्स मिळवण्यासाठी आपणही लोकसत्ताच्या मुख्यपृष्ठावरील लाईव्ह ब्लॉगला आवर्जून भेट द्या, अपडेट्स तपासूनच प्रवासाचं नियोजन करा, सुरक्षित राहा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Boyfriend angry at mumbai local delay in extreme rains says m indicator update chat box msg goes viral as trains are cancelled svs
Show comments