Girlfriend found in Suitcase Video: मुला-मुलींच्या हॉस्टेलचे अनेक किस्से आपण ऐकतो. सोशल मीडियावर हॉस्टेमधील अनेकांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात कधी एकत्र मिळून केलेली मजा मस्ती असेल, तर लपून हॉस्टेलबाहेर नाईटआऊट करणं असेल. हॉस्टेलमध्ये असताना अनेक जण काही ना काही वेडेपणा करतातच. पण, या नादात अनेकदा मर्यादा ओलांडली जाते. हॉस्टेलचे नियम वाऱ्यावर सोडले जातात आणि मुलं अक्षरश: हद्दच पार करतात. सध्या असाच काहीसा प्रकार एका ठिकाणी घडलाय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

मसाला बॉलीवूड चित्रपटाच्या कथानकाप्रमाणेच, एका विद्यार्थ्याने त्याच्या गर्लफ्रेंडला बॉईज हॉस्टेलमध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला. ही घटना हरियाणाच्या सोनीपत येथील ओपी जिंदाल विद्यापीठात घडल्याचे वृत्त आहे. तथापि, हॉस्टेलमधील रक्षकांनी त्याला पकडले. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे आणि त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

गर्लफ्रेंडला सुटकेसमध्ये भरलं अन्… (Girlfriend Found in Suitcase Viral Video)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, बॉईज हॉस्टेलच्या आवारात हॉस्टेलचे गार्ड एक सुटकेस उघडताना दिसतायत. सुटकेस उघडताच त्यामध्ये एक मुलगी दिसली. तिथे उपस्थित असलेल्या एका विद्यार्थ्याने ही घटना रेकॉर्ड केली आहे. सुटकेसमध्ये एक मुलगी आहे हे रक्षकांना आणि विद्यापीठ व्यवस्थापनाला कसे कळले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सोशल मीडिया युजर्सनी असा दावा केला आहे की, सुटकेसमध्ये अडकलेली मुलगी त्या मुलाची गर्लफ्रेंड होती, ज्याच्याकडे सुटकेस होती. ती मुलगी त्याच विद्यापीठातील आहे की बाहेरची आहे हे स्पष्ट झालेले नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @TheSquind या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “एका मुलाने त्याच्या प्रेयसीला सुटकेसमध्ये घालून मुलांच्या वसतिगृहात नेण्याचा प्रयत्न केला आणि पकडला गेला. ठिकाण : ओपी जिंदाल विद्यापीठ” अशी कॅप्शन देण्यात आली आहे.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “आमच्या हॉस्टेलमध्येही एकदा असेच घडले होते,” तर दुसऱ्याने “एवढं डोकं चालतं तरी कसं यांचं” अशी कमेंट केली; तर एक जण कमेंट करत म्हणाला, “बंद करा हे सगळं… मुलींना आणि मुलांना उघडपणे भेटू द्या. मुलींना आणि मुलांना भेटू न देण्याची ही मानसिकता थांबवा. तो/ती काहीही चुकीचे करत नाहीत, फक्त त्यांच्या प्रियकराला भेटण्यासाठी जात आहेत.” दरम्यान, विद्यापीठ व्यवस्थापनाने या विद्यार्थ्यावर काय कारवाई केली हे अद्याप कळू शकले नाही.