प्रवासादरम्यान हायवेवरून जाताना ठिकठिकाणी रस्त्याकडेला मोठे पोस्टर लावलेले तुम्ही पाहिले असतील. या मोठ्या पोस्टरवर अनेक जाहिराती असतात. काही जाहिराती या पदार्थ, वस्तू, चित्रपट, मालिका, क्रिकेट आदी गोष्टींच्या असतात. तसेच अनेकदा विविध फील्डमध्ये कामासाठी मुलं-मुली हवे आहेत, अशा जाहिराती तुम्ही आजवर पहिल्या असतील. पण, तुम्ही कधी विसर्जन सोहळ्याची जाहिरात पहिली आहे का? तर आज सोशल मीडियावर एका जाहिरातीचा फोटो व्हायरल होत आहे, जे बघून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे २८ सप्टेंबरला ठिकठिकाणी विर्सजन करण्यात येईल. जितक्या उत्साहात आपण बाप्पाचे आगमन करतो, तितक्याच उत्साहात गणेशभक्त बाप्पाची विसर्जन मिरवणूकसुद्धा काढतात. गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत अनेकजण ढोल-ताशा, डीजे यांच्या तालावर नाचतात आणि खूप धम्माल करतात. तर याच संबंधित एक मजेशीर पोस्ट व्हायरल होत आहे. अनेकदा तुम्ही तरुणांच्या तोंडून ऐकलं असेल मला फक्त गणपती डान्स करता येतो किंवा मला फक्त विसर्जन मिरवणुकीत नाचायला आवडते. तर हीच गोष्ट लक्षात ठेवून ही मजेशीर जाहिरात तयार करण्यात आली असावी. गणपती विसर्जनात नाचायला मुलं-मुली पाहिजेत आणि विसर्जनात नाचणाऱ्या मुलांना ३०० रुपये देण्यात येणार. तसेच वयोगट, वेळ, ठिकाण व फोन नंबरसुद्धा या जाहिरातीत नमूद करण्यात आला आहे; अगदी जॉबच्या जाहिरातीप्रमाणे… गणपती विसर्जन सोहळ्याची मजेशीर जाहिरात एकदा तुम्हीसुद्धा बघाच.
हेही वाचा… गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करावे की करू नये? काय आहे चर्चा व लोकप्रवाद, जाणून घ्या सविस्तर…
पोस्ट नक्की बघा :
गणपती विसर्जन जाहिरात :
आतापर्यंत फक्त जॉबसाठी जाहिराती दिल्या जातात हे आपण पाहिलं होतं, पण विसर्जनासाठीसुद्धा जाहिरात देण्यात येते हे कदाचित कोणीच आजवर पाहिलं नसेल. तर गणपती विसर्जन जाहिरातीत असे लिहिण्यात आले आहे की, गणपती विसर्जन : गर्दीमध्ये गणपती डान्स करण्यासाठी फक्त एक दिवस, दिनांक २७ सप्टेंबर रोजी १०० मुले मुली पाहिजेत. वय १८ ते ३०. वेळ संध्याकाळी ५ ते १०. स्थळ भोसरी. पेमेंट ३०० रुपये पर डे. आणि पुढे फोन नंबरसुद्धा देण्यात आला आहे ; अशी मजेशीर जाहिरात पेपरमध्ये देण्यात आली आहे.
बाप्पाच्या मिरवणुकीत नाचणाऱ्या हौशी कलाकारांसाठी ही खास जाहिरात छापण्यात आली आहे. पुण्यातील भोसरी (Bhosari) शहरात गणपती विसर्जनात नाचणाऱ्या तरुण मंडळींना जमवण्याचे काम सुरू आहे. याचसंबंधित एक जाहिरात नुकतीच मंडळाने प्रसिद्ध केली आहे, जी सोशल मीडियावर अनेकांच्या पसंतीस उतरते आहे आणि ही पोस्ट सध्या खूपच व्हायरल होत आहे. @punerispeaks या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. जाहिरात पाहून ‘रिज्युम रेडी आहे’, ‘कोणत्या मंडळाशी स्पर्था आहे’? अशा अनेक मजेशीर प्रतिक्रिया तरुण मंडळी कमेंटमध्ये देताना दिसून आले आहेत.