सोशल मीडिया हे एक प्रभावी माध्यम आहे. कोणत्याही गोष्टीची माहिती एकावेळी असंख्य लोकांना द्यायची असेल तर सोशल मीडियाद्वारे ते सहज करता येते. पण आजकाल या माध्यमाचे अनेकांना व्यसन लागल्याचे दिसून येते. अगदी आपण सध्या कुठे आहोत त्याचे लोकेशन शेअर करण्यापासून आपण आज काय काय खाल्ले इथपर्यंत सर्व गोष्टी अनेकजण सोशल मीडियावर शेअर करत असतात. यामुळे कधीकधी या ‘सोशली ॲक्टिव्ह’ राहण्याचा अतिरेक होऊन अनेकजण ट्रोल होतात. असाच काहीसा प्रकार एका मोठ्यां कंपनीच्या सीईओ बरोबर नुकताच घडला. नेमकं काय घडलं जाणून घ्या.

अमेरिकामधील कोलंबस येथे असणाऱ्या ‘हायपर सोशल’ या मार्केटिंग एजेंसीचे सीईओ ब्रेडेन वॉलेक सध्या ट्रोल होत आहेत. याचे कारण म्हणजे त्यांनी त्यांच्या आजीच्या मृत्यूबद्दल एक पोस्ट लिंकडिनवर शेअर केली आहे. या पोस्ट मध्ये काय लिहले आहे पाहा.

आणखी वाचा : “दिवाळी तरी…” मुख्यमंत्री शिंदेंना चिमुकल्याने खास वऱ्हाडी भाषेत लिहिलं शेतकऱ्यांचं गाऱ्हाण मांडणारं पत्र

ब्रेडेन वॉलेक यांची लिंकडिन पोस्ट :

ब्रेडेन वॉलेक यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे, ‘आज माझ्या आजीचा मृत्यू झाला. माझ्या आईने मेसेज करून याबद्दल सांगताच मी कम्प्युटर बंद करून, आईच्या घरी जाण्यासाठी निघालो. यावेळी तिथे जात असताना माझ्या मनात विचार येत होता की कामापेक्षाही इतर महत्त्वाच्या गोष्टी आयुष्यात आहेत. आत्ताच्या जीवनशैलीमध्ये तुम्हाला काम आणि वैयक्तिक आयुष्यामध्ये एका गोष्टीची निवड करावी लागते. मी सुद्धा असा परिस्थितीत अडकलो आहे, मी कामासाठी अनेक गोष्टींचा त्याग केला आहे. झोप, आनंद, मौज या गोष्टींना वेळ न देता मी फक्त आणि फक्त कामावर संपूर्ण लक्ष केंद्रित केले. पण जेव्हा मी ‘हायपरसोशल’ सुरू करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यामागे यामुळे लोकांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी मदत होईल आणि त्याचवेळी त्यांना कुटुंबाबरोबर वेळ घालवणेही शक्य होईल हा हेतू होता. लोकांना कामाव्यतिरिक्त आयुष्यात असणाऱ्या इतर गोष्टींचा आनंद घेता यावा हे ‘हायपरसोशल’ सुरू करण्यामागचे कारण होते. आजसारखे दिवस मला त्या हेतूची आठवण करून देतात आणि मी माझे काम का करत आहे याची जाणीव करून देतात.’

ब्रेडेन वॉलेक यांची ही पोस्ट अनेकांना कंपनीचे मार्केटिंग करण्यासाठीची ट्रिक वाटत आहे. आजीच्या मृत्यूवरून कंपनीचे मार्केटिंग करणे अनेकांना खटकले असून, ब्रेडेन वॉलेक यांना ट्रोल केले जात आहे.