कोणतेही संकट आले तरी त्या क्षणाला आपले डोके थंड ठेवून, त्यावर उपाय काढणे हे प्रत्येकाला जमतेच, असे नाही. मात्र, सध्या प्रसंगावधान बाळगून आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून उत्तर प्रदेशमधील एका १३ वर्षीय मुलीने घरात आलेल्या माकडांना पळवून लावले असल्याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या संदर्भात एएनआय [ANI]ने त्या १३ वर्षीय मुलीची मुलाखत घेतली असून, त्याचाच व्हिडीओ सध्या सर्व सोशल मीडिया माध्यमांवर व्हायरल होत आहे. नेमके काय घडले ते पाहू या.
मुलाखत देणाऱ्या मुलीने घडलेल्या घटनेबद्दल माहिती देताना सांगितले, “त्या दिवशी आमच्या घरी काही पाहुणे आले होते; मात्र घरात येताना ते घराचं दार लावायला विसरले. त्याच दारातून माकडं स्वयंपाकघरामध्ये घुसली आणि त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात नासधूस करायला सुरुवात केली. तेवढ्यात घरातली एक लहान मुलगी स्वयंपाकघरात गेली आणि सर्व दृश्य पाहून रडून तिथून पळायला लागली.”
“त्या मुलीचा आवाज ऐकून आम्ही स्वयंपाकघरात पाहिलं, तर ती माकडं सर्व अन्न इकडे-तिकडे फेकत होती आणि खूप गोंधळ घालत होती. ते दृश्य पाहून आम्ही सगळेही घाबरलो होतो. मात्र, तेवढ्यात माझी नजर अलेक्सावर पडली. तेव्हा मी अलेक्साला कुत्र्याचा आवाज काढण्याचा आदेश दिला. त्याबरोबर त्या यंत्रानं कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज काढून दाखवला. तो आवाज ऐकतच एकेक करून सर्व माकडं घाबरून पळून गेली.” हे सांगताना त्या मुलीने पुन्हा एकदा अलेक्साला तोच आदेश दिला आणि यंत्राने भुंकण्याचा आवाज काढून दाखवला.
या मुलाखतीचा व्हिडीओ एएनआयच्या एक्स [पूर्वीचे ट्विटर] अकाउंटवरून शेअर झाला असून, इन्स्टाग्रामवरदेखील चांगलाच व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांच्या यावर काय प्रतिक्रिया आहेत त्या पाहू.
“नशीब तेव्हा तरी अलेक्साने ‘सॉरी मला समजले नाही’, असे उत्तर दिले नाही”, असे एकाने मिश्कीलपणे लिहिले आहे.
“खरंच माणसाकडे बुद्धी हेच सर्वांत उत्तम शस्त्र आहे”, असे दुसऱ्याने लिहिले.
“ग्रेट! त्या मुलीचे खूप कौतुक आहे. अशा वेळेस एवढे प्रसंगावधान… खूप मस्त”, असे तिसऱ्याने लिहिले.
“वाह खूपच मस्त”, असे चौथ्याने लिहिले आहे.
व्हायरल व्हिडीओ पाहा :
इन्स्टाग्रामवरील naughtyworld नावाच्या अकाउंटद्वारे हा व्हिडीओ शेअर केला गेला आहे. आतापर्यंत या पोस्टवर ४७.२K लाइक्स आणि ३०८ कमेंट्स आलेल्या आहेत.