फायर ब्रिगेडच्या जवानांचं काम अतिशय खडतर असतं. त्यांच्याविषयी ‘सारख्या काही आगी लागत नाहीत’ असं हेटाळणीच्या स्वरात म्हणणाऱ्यांच्या हे लक्षात येत नाही की आग लागलेली असताना या जवानांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण होतो. आपला जीव धोक्यात टाकत हे जवान सामान्य नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांच्या जिवाची बाजी लावतात. एखाद्या ठिकाणी आग लागली असल्याचं वृत्त समजल्यावर अत्यंत कमी वेळात रिअॅक्ट होत त्या ठिकाणी पोचून परिस्थिती काबूत आणण्याचं मोठं आव्हान या जवानांसमोर असतं.
चीनच्या झियांगयांगमध्ये एका ठिकाणी आग लागलेली असताना तिथल्या फायर ब्रिगेडच्या एका जवानाने बजावलेल्या कामगिरीमुळे सगळीकडे त्याचं कौतुक होत आहे.
इथे एका ठिकाणी आग लागलेली असल्याची खबर मिळताच वान नावाचा हा जवान त्याच्या पथकासोबत या ठिकाणी गेला. या बिल्डिंगमध्ये लागलेली ही आग एका गॅस सिलेंडरमुळे लागली असल्याचं या पथकाच्या लक्षात आलं. या आगीमुळे या बिल्डिंगचे रहिवासी तिथे अडकले होते. आगीवर नियंत्रण मिळवत या नागरिकांची सुटका करण्यात वानच्या पथकाने यश मिळवलं. पण या जळणाऱ्या सिलेंडरचा धोका कायम होता. एलपीजी गॅस भरलेल्या या सिलेंडरचा आणखी मोठा स्फोट झाला असता तर परिस्थिती फार बिकट झाली असती. असा स्फोट होत ही बिल्डिंगच पडण्याचा धोका निर्माण झाला असता. या सिलेंडरची विल्हेवाट लावण्यासाठी लगेच काहीतरी करणं आवश्यक होतं. अशा वेळी स्वत:च्या जिवाची बाजी लावत वान ने हा सिलेंडर हाताने उचलून नेला. यावेळी या सिलेंडरचा स्फोट झाला असता तर वानचा जीवसुध्दा गेला असता. पण याची पर्वा न करत त्याने इथल्या नागरिकांचे प्राण वाचवले. वानचं हे शौर्य कॅमेऱ्यामध्ये कैद झालं आहे.