Brazil Plane Crash VIDEO : काहीच दिवसांपूर्वी ब्राझीलमध्ये व्होपास लिन्हास एरिआज कंपनीचं एटीआर-७२ हे विमान पराना राज्यातील कास्केवेल शहरातून साओ पाऊलोमधील ग्वारुलहोसला जात होतं. शुक्रवारी (९ ऑगस्ट) दुपारी पावणे दोनच्या सुमारास (स्थानिक वेळेनुसार) ही दुर्घटना घडली आहे. ब्राझीलच्या विन्हेडो प्रांतात मोठी विमान दुर्घटना घडली आहे. ६२ प्रवाशांना घेऊन जाणारं एक विमान कोसळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत ५८ जणांचा मृत्यू, तर चार जण गंभीर जखमी झालेत. या घटनेमुळे सध्या जगभरात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. मात्र, एका प्रवाशाचं नशीब असं काही चमकलं की, काही मिनिटांमुळे त्याचा जीव वाचला. नेमकं काय घडलं? हे समजल्यावर तुम्हीही म्हणाल, देव तारी त्याला कोण मारी?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय झालं?

ब्राझीलमध्ये झालेल्या विमान अपघातावेळी विमानातील सिग्नल यंत्रणेत दुपारी १.३० च्या सुमारास बिघाड झाला. त्यानंतर विमानाचा विमानतळाशी असलेला संपर्क तुटला. काही वेळाने थेट विमान कोसळल्याची माहिती मिळाली. विमान नेमकं कशामुळे कोसळलं, विमानात आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेलं नाही. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, ज्या ठिकाणी विमान कोसळलं तिथून आगीचे मोठे लोळ दिसत होते. विमान कोसळल्यानंतर एका मोठ्या स्फोटाचा आवाजही आला होता.

देव तारी त्याला कोण मारी?

या घटनेचा सगळ्यांनाच धक्का बसलेला असताना विमानतळावर उभ्या असलेल्या एका व्यक्तीला मात्र सुखद धक्का बसला. आता तुम्ही म्हणाल, या दुःखद घटनेत सुखद धक्का कसला? तर कास्केवेलच्या एअरपोर्टवर उभ्या असलेल्या ॲड्रियानो ॲसिसचे काळजाचे ठोके चुकले अन् त्याने सुटकेचा श्वास घेतला. खरंतर ॲड्रियानो ॲसिस याला विमानतळावर पोहोचायला उशीर झाला आणि त्यामुळे त्याचं विमान चुकलं. विमानात जाण्यासाठी ॲड्रियानो ॲसिस याने क्रु अधिकाऱ्यांशी भांडणदेखील केलं, पण त्याला उशीर झाल्यामुळे विमानात शेवटपर्यंत बसू दिलं नाही. एकीकडे आपलं विमान चुकलं या प्रचंड रागात असणाऱ्या व्यक्तीला ही माहिती मिळताच जोरात धक्का बसला. यावेळी जर अधिकाऱ्यांनी त्याला विमानात बसायला परवानगी दिली असती तर कदाचित त्याचादेखील या अपघातात मृत्यू झाला असता.

प्लेन क्रॅश झालं अन् तो ढसाढसा रडला

यानंतर या व्यक्तीने दिलेल्या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्यक्तीचे नाव ॲसिस असून, ॲसिसने आउटलेटला सांगितले की, जेव्हा तो विमानतळावर आला तेव्हा त्याने बोर्डिंगच्या घोषणेची वाट पाहिली, परंतु काहीही ऐकले नाही. नंतर काही तरी गडबड झाल्याचे त्याच्या लक्षात आले. तो धावत जाऊन बोर्डिंग गेटवर पोहोचला तेव्हा त्याला समजलं की बोर्डिंग जरा आधी झालंय. क्रूसोबत वाद आणि मारामारी झाली आणि त्याचे फ्लाइटही चुकले, पण काही वेळाने विमान अपघाताची बातमी ऐकून तो हादरला आणि ढसाढसा रडायला लागला असं तो सांगतो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Brazil Plane Crash VIDEO : ब्राझीलमध्ये ६२ प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं, विमान जळून खाक

दरम्यान, देवाचे आभारी आहोत की मी त्या विमानात चढलो नाही, असंही ॲसिसने यावेळी सांगितलं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brazil plane crash man escapes deadly brazil plane crash denied boarding for being late shocking video viral srk