घरांच्या छपरांवर कावळा, चिमणी, कबूतर यांसारखे पक्षी किंवा फार फार तर कुत्रा, मांजरीसारखे लहान मोठे प्राणी चढलेले आपण पाहिले आहेत. परंतु ब्राझीलमध्ये चक्क एक गाय घराच्या छपरावर चढली, आणि ती छप्पर तोडून थेट घरातील व्यक्तिच्या अंगावर कोसळली. या विचित्र अपघातात त्या व्यक्तिचा मृत्यृ झाला आहे. या मृत व्यक्तिचे नाव जोओ मारिआ डे सॉजा असे आहे. त्याचे वय ४५ वर्ष होते व तो व्यवसायाने शेतकरी होता.
जोओ मारिआ दुपारचे जेवण करुन घरात आराम करत होता. दरम्यान त्याने आपली गाय घराबाहेर बांधून ठेवली होती. मात्र, गळ्यातील फास सैल झाल्यामुळे गाय खुंटी सोडून गोठ्याच्या बाहेर पळाली. बाहेर पळालेली गाय भिंतीच्या आधारे थेट घराच्या छपरावर चढली. गायीचे वजन दीड टन होते. इतके जास्त वजन मोडकळीस आलेल्या छपराला सहन झाले नाही व ती गाय थेट घरात झोपलेल्या आपल्या मालकाच्या अंगावर कोसळली. अचानक दीड टन वजन छातीवर कोसळल्याने जोओ मारिआ जबर जखमी झाला. त्यानंतर लगेचच त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र, छातीच्या बरगड्या तूटल्यामुळे त्याचा उपचारादरम्यान मृत्यृ झाला.