चीन आणि भारत या दोन्ही देशांमध्ये कितीही शत्रुत्त्व असलं तरी चीनमध्ये भारतीय चित्रपटांचा मोठा प्रेक्षकवर्ग असल्याचं सत्य नाकारता येत नाही. याचा प्रत्यय नुकताच ब्रिक्स परिषदेत आला. ब्रिक्स परिषदेचं वार्तांकन करण्यासाठी एक चीनी पत्रकार तिथे उपस्थित होती. तेव्हा तिने ‘एएनआय’ वृत्तवाहिनीच्या कॅमेऱ्यासमोर चक्क हिंदीत गाणं गाऊन दाखवलं. ती इतक्या अस्खलितपणे हिंदीत गात होती की, सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

तांग युआंगई ही चायना रेडिओची पत्रकार आहे. ‘तुला हिंदी येते का?’ असं जेव्हा तांगला विचारलं तेव्हा तिचं उत्तर अनपेक्षित होतं. आपल्याला बऱ्यापैकी हिंदी समजतं असं, सांगत तिने हिंदी चित्रपटातलं गाणंही गाऊन दाखवलं. तांगनं १९७९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ नूरी’ चित्रपटातलं ‘आजा रे…आजा रे ओ मेरे दिलबर आजा’ हे गाणं गाऊन सगळ्यांना धक्काच दिला. ती इतक्या सहजपणे हे गाणं गात होती की अनेकांना आश्चर्य वाटलं. तांग काही वर्षांपूर्वी भारतात आली होती. त्यावेळी तिने हिंदी शिकण्याचा प्रयत्न केला होता. आपल्याला भारत खूप आवडतो आणि भारतातल्या अनेक भागात आपण फिरलो आहोत, असंही ती म्हणाली. भारत आणि चीनमधलं शत्रुत्त्व मिटावं, अशी आशाही तिनं व्यक्त केली.

Story img Loader