लग्नाच्या वरातीत नागीण डान्स केला नाही तर तुम्ही काय नाचलात राव? या डान्सशिवाय वरातीला मज्जा नाही आणि हे वाचणारे अर्ध्याहून अधिक लोक या मताशी सहमतही असतील. जोपर्यंत वरातीत वऱ्हाडांनी नागीण डान्स करून धिंगाणा घालत नाही, तोपर्यंत काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटतं. तेव्हा एरव्ही आपल्याला नाच वगैरे जमत नसला तरी हा एक डान्स मात्र आपल्याला उत्तम जमतो असं म्हटलं तर चुकं ठरणार नाही. त्यातून लग्नाच्या वरातीत अशी हौस भागवून घेणाऱ्यांची आपल्याकडे काही कमी नाही, पण आपल्याच लग्नात नागीण डान्स करण्याची हौस एका नवऱ्याला भलतीच महागात पडली. या हौसेपायी त्याचं भर मंडपात लग्न मोडलं. विश्वास बसत नाहीय ना? पण शहाजहानपूर येथे खरंच असा प्रकार घडला आहे.
वाचा : ‘LG’चा फुलफॉर्म माहितीये?
२३ वर्षांच्या प्रियांका त्रिपाठीचं लग्न अनुभव मिश्रा ह्याच्याशी ठरलं होतं. आता आयुष्यातला सर्वात मोठा दिवस आहे म्हटल्यावर या नवऱ्याला आणि त्याच्या मित्रांचाही आनंद गगनात मावेनासा झाला. तेव्हा मित्रांसोबत दारू पिऊन अनुभवने धिंगाणा घालायला सुरूवात केली. जणू त्यांच्या अंगात नागीण शिरल्यासारखाच तो नाचू लागला. जेव्हा प्रियांकासह तिच्या कुटुंबियांनी नागिण डान्स करण्यात तल्लीन असलेल्या अनुभवला पाहिलं तेव्हा त्यांना धक्काच बसला. अनुभव दारू पितो हे कळल्यावर तर प्रियांकाने तिथल्या तिथेच लग्न मोडून टाकलं. प्रियांकाला अनेकांनी समजावण्याचा प्रयत्न केला पण ती मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहिली. ‘टाइम्स ऑफ इंडियाला’ दिलेल्या माहितीनुसार नंतर प्रियांकाने दुसऱ्या मुलाशी लग्न केलं.
वाचा : प्रदूषण रोखणाऱ्या अशा इमारती आपल्याकडंही बांधता येतील का?