लग्न म्हटल्यानंतर कपड्यांची आवडनिवड आणि खरेदी सारख्या गोष्टी आल्याच. त्यातही वधू-वराची पसंती जुळून येणं आणि दोघांच्या संमतीने कपडे घेण्याची तारेवरची कसरतही लग्नातील एक महत्त्वाचा भाग अशतो. मात्र उत्तरखंडमध्ये कपड्यांवरील वादामधून चक्क एक लग्न मोडल्याचा प्रकार घडला आहे. उत्तरखंडमधील हल्दवानीमधील एका वधूने ठरलेलं लग्न मोडण्यासाठी दिलेलं कारण ऐकून तिच्या घरच्यांनाही धक्का बसला. आपल्याला महागडा लेहंगा घेतला नाही म्हणून या मुलीने लग्नास ऐनवेळी नजार दिला.
नक्की वाचा >> Love At First Voice? मॉर्निंग वॉकला गाणं गुणगुणत चालणाऱ्या ७० वर्षीय इसमाच्या प्रेमात पडली १९ वर्षांची तरुणी; लग्नही केलं
स्थानिक प्रसारमाध्यमांच्या हवाल्याने न्यू इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार राजपूरा परिसरातील या तरुणीचा साखरपुडा यापूर्वीच झाला होता. लग्नासाठी मुलाकडच्यांनी आपल्याला घेतलेल्या लेहंग्याची किंमत अवघी १० हजार रुपये असल्याचं तिला समजलं. त्यामुळे नाराज झालेल्या या मुलीने नखरे करण्यास सुरुवात केली. मात्र मुलाच्या घरच्यांनी खास लखनौवरुन हा लेहंगा मागवण्यात आल्याचं मुलीला सांगितलं. तरीही या मुलीने आपण इतक्या स्वस्त लेहंग्याने समाधानी नसल्याचं सांगितलं. यावरुन दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला आणि हा वाद थेट पोलीस स्थानकामध्ये पोहोचला.
कोठीवाला पोलीस स्थानकामध्ये हे प्रकरण पोहोचलं. अनेक तास दोन्ही बाजूने वादविवाद झाल्यानंतर वर आणि वधू पक्षाने नातं पुढे न्यायचं नाही असं ठरवलं आणि लग्न मोडलं. तरी पोलिसांना मध्यस्थी करुन दोन्ही बाजूच्या लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या या प्रयत्नांना फार यश आलं नाही. दोन वरिष्ठ पोलीस आधिकाऱ्यांसमोर अनेक तास झालेली चर्चा आणि वादविवादानंतर लग्न मोडलेलं योग्य या निर्णयावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली.
नक्की वाचा >> ८ हजार ६५८ वर्षांचा तुरुंगवास! ‘या’ व्यक्तीला न्यायालयाने सुनावलेली शिक्षा जगभरात चर्चेचा विषय; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय
आरोग्य क्षेत्राशी संबंधित कंपनीत कामाला असलेल्या मुलाबरोबर या मुलीचं लग्न ठरलं होतं. जून महिन्यात साखरपुडा झाला होता. पाच डिसेंबर रोजी लग्न होणार होतं. लग्नाच्या पत्रिकाही छापून, वाटून झाल्या होत्या. मात्र लग्नाला लेहेंगा पाहून मुलगी नाराज झाली आणि त्यातून वाद झाला तो लग्न मोडण्यापर्यंत पोहोचला. विशेष म्हणजे मुलाने या मुलीला त्याचं एटीएम देऊन हव्या तेवढा महाग लेहेंगा घेऊन ये असंही सांगितलं होतं. मात्र मुलीने ही ऑफर नाकारली आणि प्रकरण नातेवाईकांमधील वादापर्यंत गेल्यानंतर पोलिसांसमोरचं लग्न मोडलं.