मध्य प्रदेशमधील उज्जैनमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याने एक विचित्र समस्या निर्माण झालीय. ऐन लग्नाच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्याने नववधूचं लग्न अंधारात नियोजित मुलासोबत लावून देण्याऐवजी भलत्याच मुलासोबत लागलं.
झालं असं की निकिता आणि करिष्मा या दोन सख्ख्या बहिणींचं लग्न रविवारी डांगवारा भोला आणि गणेश या दोन तरुणांशी होणार होतं. मात्र ऐन लग्नाच्या वेळेस वीजपुरवठा खंडित झाला अन् गोंधळ उडाला. मात्र अंधारामध्येच लग्न लावण्यात आली. एकाच मंडपात दोन्ही बहिणींची लग्न असल्याने आणि त्यांचा लग्नाचा पेहराव सारखाच असल्याने नवरदेवांचा गोंधळ उडाला. अंधारामध्ये निकितासाठी ठरवलेल्या मुलाचं लग्न करिष्मासाठी ठरवलेल्या मुलाशी झालं. मात्र अंधारामध्ये हा गोंधळ लग्नाच्या मंडपात उपस्थित असणाऱ्या वऱ्हाड्यांच्या लक्षात आला नाही.
लग्न लागून घरी गेल्यानंतर दोन्ही घरातील व्यक्तींना घडलेला गोंधळ समोर आला. तिन्ही कुटुंबामध्ये मोठा वाद झाला. मात्र अखेर समोपचाराने यावर तोडगा काढण्यावर तिन्ही कुटुंबांनी होकार दर्शवल्याचं इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तात म्हटलंय. मूळ लग्नात झालेला हा गोंधळ लक्षात आल्यावर दुसऱ्या दिवशी पुन्हा या तिन्ही कुटुंबांनी चौघांचं पूर्वप्रमाणे नियोजित जोडीदारासोबत लग्न लावून दिलं.
काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान हे भोपाळमध्ये एका ठिकाणी भाषण देत असतानाच अचानक वीजपुरवठा खंडित झाला आणि मुख्यमंत्री चांगलेच संतापले. “वीज पुरवठा करणाऱ्या विभागाचे मुख्य सचीव संजय दुबे इथे आहेत का?”, असा प्रश्न चौहान यांनी विचारला आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. हा वीज पुरवठा पाच मिनिटांनंतर सुरळीत झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा भाषण सुरु केलं.