लग्न हा आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा, त्यामुळे यादरम्यान काय करु आणि काय नको असे अनेकांना झालेले असते. मग काही ना काही अनोखी शक्कल लढवली जाते. अशीच एक शक्कल एका जोडप्याने लढवली मात्र त्यांना ती महागात पडली. श्रीलंकेतील एका नवरीने नुकतीच आपल्या लग्नात ३.२ किलोमीटरची साडी नेसली होती. आता इतकी लांब साडी म्हटल्यावर ती सांभाळणार कशी असा प्रश्न होताच. त्यावेळी २५० शाळकरी विद्यार्थ्यांकडून हे साडी सांभाळण्याचे काम करवून घेण्यात आले. या नवरीच्या घरापासून ते लग्नसमारंभाच्या ठिकाणापर्यंत या शालेय मुलांनी वधूची ही साडी सांभाळली. हे जोडपे रस्त्यातून चालत असताना ही साडी धरुन शालेय मुले तिच्यामागे चालत असल्याचे पाहायला मिळाले.
इतकेच नाही तर लग्नसमारंभाच्या ठिकाणीही १०० शालेय मुले फुले वाटण्यासाठी नेमण्यात आली होती. राष्ट्रीय बाल संरक्षण अधिकारांतर्गत या घटनेत संबंधित जोडप्याला कठोर शिक्षा होण्याची शक्यता आहे. शाळेच्या वेळेदरम्यान शालेय मुलांना अशापद्धतीने काम करायला सांगणे कायद्याने गुन्हा असल्याचे या अधिकारात म्हटले आहे. त्यामुळे दोषींना १० वर्षांची शिक्षा होऊ शकते. या वधूने जी साडी नेसली होती तिला श्रीलंकेतील सर्वात मोठी साडी म्हणून ओळखले जात आहे. या मुलांना श्रीलंकेतील २ मोठ्या शाळांमधून बोलविण्यात आले होते. यातील एक शाळा येथील मुख्यमंत्र्यांचीच आहे असेही म्हटले जात आहे. शालेय मुलांना शिक्षणापासून दूर ठेवणे हा गुन्हा असल्याने दोषींवर वेळीच कारवाई केली जाईल असे राष्ट्रीय बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. हे काम करण्यासाठी मुलांना कोणताही पर्याय देण्यात आला नव्हता त्यामुळे प्रत्येकाला हे काम करणे सक्तीचे होते.
मोतीया रंगाची ही साडी पकडलेली मुले आपल्याला फोटोमध्ये दिसत आहेत. तर अतिशय सजलेल्या वेशात वधू आणि वरही दिसत आहेत. शाळेच्याच गणवेशात असलेल्या अतिशय लहान मुली या वधूची साडी सांभाळताना दिसत आहेत. त्यामुळे करायला गेले एक आणि झाले भलतेच अशीच काहीशी गत या जोडप्याची झाल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.