ऋषी सुनक हे ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान होणारे पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती ठरले आहेत. सोमवारी ब्रिटनच्या पंतप्रधानपदी सुनक यांची निवड झाल्याने एक नवा इतिहास रचला गेला. सुनक हे ब्रिटनचे गेल्या चार वर्षांतले पाचवे पंतप्रधान आहेत, शिवाय ते माजी अर्थमंत्रीही असल्याने ब्रिटनला आर्थिक संकटामधून बाहेर काढण्यात ते यशस्वी होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सुनक हे पंतप्रधान होणार असल्याची बातमी समोर आल्यानंतर आता सर्वच स्तरातून भारतीयांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असताना त्यांचे सासरे ‘इन्फोसिस’चे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती आणि सासू सुधा मूर्ती सुद्धा चर्चेत आहेत. विशेष म्हणजे ब्रिटनच्या या नव्या पंतप्रधानांच्या सासूबाई म्हणजेच समाजिक कार्यकर्त्या असणाऱ्या सुधा मूर्ती यांचं मराठीशी एक वेगळं कनेक्शन आहे.
नक्की वाचा >> Britain PM Rishi Sunak: जावई ब्रिटनचा पंतप्रधान झाल्यानंतर नारायण मूर्तींची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, “ऋषीचं अभिनंदन, आम्हाला…”
स्टॅनफर्डमध्ये भेट अन् भारतीय मुलीशी सुनक यांचं लग्न
सिलिकॉन व्हॅलीतील शिक्षण केंद्रांपैकी एक असणाऱ्या स्टॅनफर्ड विद्यापीठामध्ये पहिल्यांदा ऋषी आणि मूर्ती दांपत्याची मुलगी अक्षता यांची भेट झाली होती. एमबीएचं शिक्षण घेताना ऋषी आणि अक्षता दोघे पहिल्यांदा भेटले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर ऋषी आणि अक्षता यांनी २००६ मध्ये बंगळुरु येथे दोन दिवसांच्या समारंभामध्ये लग्नगाठ बांधली. ऋषी यांचा जन्म इंग्लंडमधील साऊथहॅम्टन येथील असला तरी त्यांचे पालक भारतीय वंशाचे आहेत. सुनक पंतप्रधान झाल्याने इंटरनेटवर त्यांच्या सासू-सासऱ्यांबद्दलही मोठ्या प्रमाणात माहिती सर्च केली जात आहे. विशेष म्हणजे सुनक यांच्या सासू सुधा मूर्ती यांचं माहेरचं नाव कुळकर्णी आहे. कर्नाटक आम्ही महाराष्ट्राच्या सीमाभागामधील शिवगाव येथे १९ ऑगस्ट १९५० रोजी सुधा यांचा जन्म झाला.
सुधा मूर्ती कुळकर्ण्यांची लेक
सुधा यांनी सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विमल कुळकर्णी आणि डॉ. आर.एच. कुळकर्णी हे त्यांच्या पोटी जन्माला आलेल्या सुधा यांची समाजसेवेतील तळमळ वाखाणण्याजोगी आहे. ग्रामीण भागातील विकासासाठी त्या काम करतात. त्या अमेरिकेतील कॅलटेक या प्रसिद्ध कंपनीतील शास्त्रज्ञ श्रीनिवास कुळकर्णी यांच्या, तसेच प्रसिद्ध अमेरिकन व्यावसायिक गुरुराज देशपांडे यांच्या पत्नी-जयश्री कुळकर्णी-देशपांडे- ह्यांच्या भगिनी आहेत. सुधा मूर्ती यांनी नऊहून अधिक कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांच्या नावावर अनेक कथासंग्रह आहेत. त्यांच्या अनेक कादंबऱ्या आणि कथासंग्रह मराठीत भाषांतर करण्यात आले आहेत.
पाहा व्हिडीओ –
पुण्यातून शिक्षण
सुधा मूर्ती यांनी पुण्यातील भारती विद्यापीठाच्या इंजिनीअरिंग काॅलेजमधून बी.ई. इलेक्ट्रिकलची पदवी सुवर्णपदकासह मिळवली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथून त्या संगणक शास्त्रात एम.ई. झाल्या आहेत. त्यांच्याकडे कॉम्प्युटर सायन्स या विषयातील एम्. टेक. ही पदवी आहे. सुधा मूर्तीनी संगणक शास्त्रज्ञ व अभियंता म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. टेल्को कंपनीत निवड झालेल्या त्या पहिल्या महिला अभियंत्या होत्या.
मराठी कनेक्शन…
टाटा कंपन्यांसाठी त्यांनी पुणे, मुंबई आणि जमशेदपूर येथे काम केले आहे. शिवाय, पुण्याच्या ख्राईस्ट कॉलेजात त्या प्राध्यापक होत्या. त्यामुळेच सुधा मूर्ती यांना मराठी भाषा सजते आणि काही प्रमाणात बोलता येते. मध्यंतरी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी आवर्जून मराठीमध्ये उत्तरे दिली. त्यांनी आपल्या कुटुंबाबद्दल तसेच सुरुवातीच्या करियरबद्दलची माहिती मराठीमध्येच दिली होती. माझे वडील कोल्हापूरमध्ये डॉक्टर होते. “१९५६ राज्यांची पुन:रचना झाली तेव्हा आम्ही कर्नाटकमध्ये आले. पहिल्या दोन इयत्ता मी मराठीमध्ये शिकलेले आहे,” असं सुधा मूर्तींनीच ‘एबीपी माझा’ला दोन वर्षांपूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. बंगलोर विद्यापीठात त्या अभ्यागत प्राध्यापिका आहेत. इन्फोसिस या संस्थेच्या कार्यात त्यांचा विशेष सहभाग आहे. या संस्थेच्या विश्वस्त म्हणूनही त्या काम पाहतात.
मराठीमधून लिखाण
सुधा मूर्ती या मराठी, कन्नड आणि इंग्रजी भाषेमधून लिखाण करतात. इन्फोसिस फाऊंडेशन या एक सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेच्या निर्मितीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. या संस्थेच्या त्या सह-संस्थापिका आहेत. इन्फोसिस फाऊंडेशनच्या माध्यमातून मूर्ती यांनी समाजाच्या विविध क्षेत्रांत विकासकामांना प्रोत्साहन दिले आहे. कर्नाटक सरकारच्या सर्व शाळांत त्यांनी संगणक आणि ग्रंथालये उपलब्ध करून दिली आहेत. त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात मूर्ती क्लासिकल लायब्ररी ऑफ इंडिया या नावाचे ग्रंथालय सुरू केले आहे. कर्नाटकातील ग्रामीण भागांत आणि बंगलोर शहर व परिसरात त्यांनी सुमारे १०,००० शौचालये संस्थेच्या माध्यमातून बांधली आहेत. तमिळनाडू आणि अंदमान येथे त्सुमानीच्या काळात त्यांनी विशेष सेवाकार्य केले आहे. महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील लोकांनाही संस्थेने मदत दिलेली आहे.