सोशल मीडियावर विमानाच्या लँडिंगचा एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. जोरदार वाऱ्यामुळे ब्रिटीश एअरवेजच्या विमानाचा अपघात होता होता टळला आहे. काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य कॅमेऱ्यात चित्रित झालं आहे. बीए १३०७ विमान अॅबरडीनहून लंडनच्या हिथ्रो विमानतळाजवळ येत होतं. मात्र कॉरी वादळामुळे विमानाला धक्का बसला. यामुळे प्लेन पुन्हा एकदा टेक ऑफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. विमानाचं शेपूट रनवेवर लागता लागता वाचलं. थोडासा फरक असताना विमानाने उड्डाण घेतलं. क्षणाचाही विलंब झाला असता तर दुर्घटना घडली असती.
कॅमेऱ्यात चित्रित झालेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, विमान धावपट्टीवर लँडिंग करताना जोरदार वाऱ्यामुळे डोलत आहे. डाव्या बाजूला असलेल्या चाकाचा आधार मिळाला. तर उजवीकडून विमान वर उचललं गेलं आहे. दुसरीकडे विमानाची शेपटी जमिनीला स्पर्श करता करता राहिली. वैमानिकाच्या ही बाब लक्षात येताच त्याने विमान पुन्हा टेकऑफ करण्याचा निर्णय घेतला. हा व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीला सुरुवातीला वाटलं की विमान व्यवस्थितरित्या उतरेल. वैमानिक भाग्यवान आहे, असं म्हणताना व्हिडीओत ऐकू येत आहे. “त्याला लँडींग करणं जमलं आहे.” पण जेव्हा विमान वाऱ्यावर डोलू लागलं तेव्हा मात्र त्याच्या बोलण्यातून चिंता जाणवू लागते. “हळू..हळू…अरे देवा” असं तो शेवटी म्हणतो. थोड्या वेळानंतर विमान व्यवस्थितरित्या लँड केल्याचं विमानतळ प्रशासनाने सांगितलं आहे. दुसरीकडे विमानाचं शेपूट जमिनीला घासलं की नाही याबाबत माहिती नाही.
“आमचे वैमानिक अशा परिस्थितींचा सामना करण्यासाठी प्रशिक्षित आहेत. आमच्या फ्लाइट क्रू विमान व्यवस्थितरित्या उतरवले. विमानातील सर्व प्रवासी सुखरुप आहेत.”, असं ब्रिटीश एअरवेजच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. कोरी वादळामुळे युकेमध्ये गेल्या आठवड्यात हाहाकार उडाला आहे. १४० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याने विध्वंस घडवून आणला आहे. या वादळात आतापर्यंत दोन लोकांचा जीव गेला आहे. तर वीज नसल्याने जनजीवन प्रभावित झालं आहे. शाळा बंद असून ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.