‘आम्ही आदर्श जोडेपे आहोत ना?’ अंथरुणात खिळलेल्या ९१ वर्षांच्या वेरानं आपल्या नातीला विचारलेला शेवटचा प्रश्न. त्यानंतर तिची प्राणज्योत कायमचीच मालवली. आपल्या आजींनी मरताना शेवटचा प्रश्न हाच का केला हे जेव्हा तिच्या नातीला समजलं तेव्हा ‘तुम्ही खरंच आदर्श जोडपं होता’ असं तिच्या तोंडून आपसूक बाहेर पडलं असेल.
विल्फ आणि वेरा हे ब्रिटीश जोडपं ७० वर्षांपूर्वी एकमेकांशी विवाहबंधनात अडकले. शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकांना साथ द्यायची असं वचन एकमेकांना ७० वर्षांपूर्वी त्यांनी दिलं होतं आणि ते पाळलंही, म्हणूनच ज्या दिवशी वेराच्या पतीचे निधन झाले त्याच दिवशी आणि पुढच्या चौथ्या मिनिंटाला वेराने देखील या जगाचा निरोप घेतला. वेरा १६ वर्षांची असताना तिचे १८ वर्षांच्या विल्फशी लग्न झाले होते. विल्फ ब्रिटीश सैन्य दलात होते. विल्फ आणि वेराला दोन मुलं, पाच नातवंड आणि सात पतवंड. एकमेकांना सुख दुखात साथ देत दोघांनी सुखाने संसार केला. पण ९३ वर्षाीय विल्फ यांना वृद्धपकाळामुळे अनेक आजार जडले, स्मृतीभ्रंशामुळे त्यांना लग्नाची पत्नी आठवेना झाली म्हणूनच त्यांच्या मुलांनी रुग्णालयात त्यांना दाखल केलं. तर दुसरीकडे आपल्या पतीच्या आजारपणामुळे वेरांने देखील जगण्याची आशा सोडली, त्यांनाही दुस-या एका रुग्णालयात भरती करण्यात आलं. अखेर विल्फ यांनी गेल्या आठवड्यात बुधवारी ६ वाजून ५० मिनिटांनी शेवटचा श्वास घेतला तर शेजारी असलेल्या रुग्णालयात वेराने ६ वाजून ५४ मिनिटांनी जगाचा निरोप घेतला.
अनुराग बसू यांचा काही वर्षांपूर्वी ‘बर्फी’ चित्रपट आला होता. या चित्रपटाचा शेवटही काहीसा असाच होता. बर्फी अर्थात रणबीर कपूर शेवटचे क्षण मोजत असतो आणि त्याच्याच बाजूला झिलमिल म्हणजे प्रियांका चोप्रा बसलेली असते. ज्यावेळी बर्फी या जगाचा निरोप घेतो त्याचवेळी झिलमिलचा जगण्याचा संघर्ष देखील कायमचा संपलेला असतो. पण हे केवळ चित्रपटात घडलं होतं पण कोणाला ठावूक होतं की पाच वर्षांनानंतर रिल लाईफवरचा हा प्रसंग रिअल लाईफमध्येही घडेल.