भारतातील ब्रिटनचे उच्चायुक्त असलेल्या अॅलेक्स एलिस यांनी ट्विटरवर एक अनोखा पोल घेतला आहे. हा पोल होता डोसा खाण्याबद्दलचा. हा पोल खास भारतीयांना उद्देशून होता बरं का. होय, अॅलेक्स एलिस यांनी ट्विटरवर पोल घेत विचारलं कि, “दक्षिण भारतीयांनो, तुम्हीच सांगा मी डोसा कसा खाऊ?” आणि २ पर्याय दिले, हाताने? कि नाईफ आणि फोर्कने? विशेष म्हणजे या पोलला भारतीयांनी भरपूर प्रतिसाद दिला आहे. तब्बल ९२% लोकांनी या दोन पर्यायांपैकी पारंपरिक अर्थात हाताने खाण्याचा पर्याय निवडला. पुढे काय झालं? हा किस्सा नेमका काय आहे? जाणून घेऊया
अॅलेक्स एलिस म्हणाले, “एकदम मस्त”
अॅलेक्स एलिस यांनी ट्विटरवर घेतलेल्या या पोलला २ हजार ५३७ जणांनी प्रतिसाद देत आपली मत नोंदवली. तर यांतील तब्बल ९२% लोकांनी सांगितलं कि, डोसा हातानेच खा. मग काय? नाईफ आणि फोर्क बाजूला ठेवून अॅलेक्स एलिस यांनी भारतीयांचं म्हणणं ऐकलं आणि हाताने डोसा खाल्ला. डोसा खातानाचा आपला हाच व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत अॅलेक्स एलिस यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं कि, “होय, ९२% भारतीय अगदी बरोबर आहेत. डोसा हातानेच खाल्ल्यावर उत्तम लागतो आहे” इतकंच काय तर अॅलेक्स यांनी या कॅप्शनमध्ये खाली “एकदम मस्त” असं देखील लिहिलं आहे.
92% of Twitter is correct! It tastes better with the hand. ✋
ಮಸಾಲೆ ದೋಸೆ | ಬೊಂಬಾಟ್ ಗುರು? | एकदम मस्त ? https://t.co/fQJZ3bKfgW pic.twitter.com/xoBM2VEqxD
— Alex Ellis (@AlexWEllis) August 5, 2021
भारतीयांच्या भन्नाट कमेंट्स
अॅलेक्स एलिस यांच्या पोलला भरपूर प्रतिसाद दिला आणि असंख्य वेगवेगळ्या कमेंट्स देखील पाहायला मिळाल्या. एका ट्विटर युझरने म्हटलं कि, “पुढच्या वेळी डोसा खाताना गट्टी चटणीसुद्धा मागून घ्या” तर दुसऱ्या एका युझरने म्हटलं कि, “अनेक एलिट क्लास भारतीयांसाठी हा एक धडा आहे” काहींनी म्हटलं “तुम्ही सुपर कूल आहात. आता साऊथ इंडियन थाळीसुद्धा चाखून पाहा” तर काही म्हणाले, “भारतीय जेवणाची खरी चव ही हाताने खाल्ल्यावरच येते.” इतकंच नव्हे तर अनेकांनी एलिस यांना आणखी अनेक चविष्ट दक्षिण भारतीय पदार्थांची यादीच दिली.