ब्रिटिश पत्रकार पिअर्स मॉर्गन आणि माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग पुन्हा एकदा ट्विटरवर भिडले. यावेळचे कारण होते कबड्डी विश्वचषकाचे. इंग्लंडच्या कबड्डी संघाला भारताने मात दिल्यानंतर ट्विटरवर सक्रिय असणाऱ्या वीरेंद्र सेहवागने यासंदर्भातील एक ट्विट पोस्ट केले होते. भारताने इंग्लंडच्या संघाला ६९-१८ अशी मात दिली. भारतीय संघाचे अभिनंदन करत सेहवागने एक ट्विट पोस्ट केले होते. ‘इंग्लंड लूज (सेहवागने ट्विटमध्ये loose शब्दाचा वापर केला, ज्याचा अर्थ ‘ढिला पडणे’ अथवा ‘ढिले पडणे’ असा आहे.) इन ए वर्ल्ड कप अगेन, ओन्ली द स्पोर्टस् चेंजेस, धिस टाइम इन कबड्डी. इंडिया ट्रॅश देम ६९-१८, ऑल दी बेस्ट फॉर सेमिज #INDvENG.” अशाप्रकारचे हे ट्विट आहे. या ट्विटचा अर्थ काहीसा असा होतो – विश्वकपमध्ये इंग्लंडची आणखी एक हार. यावेळी खेळाचा प्रकार फक्त वेगळा होता. यावेळी कबड्डी विश्वचषक होता. भारताने त्यांना ६९-१८ असे धुतले. उपांत्य सामन्यासाठी भारतीय संघाला शुभेच्छा!

ट्विटरवर सेहवागला अतिशय बारकाईने फॉलो करणारा ब्रिटिश पत्रकार पिअर्स मॉर्गनने सेहवागच्या या ट्विटमध्ये एक चूक शोधली. सेहवागच्या या चुकीची दुरुस्ती करत त्याने सेहवागची खिल्ली उडविण्याचा प्रयत्न केला. सेहवागची चूक दर्शवत पिअर्सने ट्विट केले – ‘It’s lose not loose’ (या लूजचा अर्थ ‘घालविणे’ अथवा ‘हरणे’) असा आहे. मॉर्गनच्या या ट्विटनंतर ट्विटरकरांनी मॉर्गनला निशाण्यावर घेतले.

सेहवाग आणि मॉर्गन ट्विटरवर एकमेकांना भिडण्याची ही पहिलीच घटना नाही. रिओ ऑलिंम्पिकनंतर ऑलिम्पिक आणि भारताची कामगिरी या विषयांवर त्यावेळी जणू ट्विटर वॉर सुरु झाले होते. या टविटरवॉरमध्ये भारताची खिल्ली उडवण्यासाठी ब्रिटिश पत्रकार पिअर्स मॉर्गनदेखील उतरला होता. क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने त्याला आपल्या खास शैलीत डिवचले होते. त्यामुळे दुखावलेल्या पिअर्सने वीरेंद्र सेहवागशी १० लाखांची पैज लावली होती. ‘इंग्लडने वनडे वर्ल्ड कप जिंकण्यापूर्वी भारताने ऑलिम्पिकमध्ये एकतरी सुवर्ण पदक जिंकून दाखवावे अन्यथा वीरेंद्र सेहवागने १० लाख रुपये दान करावे’ अशी पैज मॉर्गनेने लावली होती. आपल्या ट्विटर अकाउंटवरून त्याने खुलेआम सेहवागला आव्हान दिले होते. पण हे ट्विट टाकल्यावर वीरेंद्र सेहवागने मॉर्गनची आपल्या शैलीत चांगलीच टर उडवली होती. त्यामुळे लगेच मॉर्गनने आपले ट्विट डिलिट करून नवीन ट्विट टाकले होते.

‘अब्जावधी लोकसंख्या असलेला भारतासारखा देश ऑलिम्पिकमध्ये फक्त दोन पदके घेऊन येतो आणि त्याचा आनंद उत्सवासारखा साजरा केला जातो ही लाजीरवाणी गोष्ट आहे’ असे ट्विट याआधी मॉर्गनने केले होते. तेव्हा ‘आम्ही प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींचा आनंद साजरा करतो. ज्या देशात क्रिकेट खेळाचा जन्म झाला त्या देशाला एकदाही वर्ल्ड कप जिंकता आला नाही ही खरी लाजीरवाणी गोष्ट आहे’ असे उपहासात्मक ट्विट करत वीरेंद्र सेहवागने मॉर्गनची बोलती बंद केली होती. त्यानंतर या दोघांमध्ये सुरु असलेले ट्विटरवॉर अख्या जगाने पाहिले होते.

Story img Loader