कॉमिक्स, कार्टून व चित्रपटांमध्ये धमाकेदार अॅक्शन करणारा सुपरहिरो फ्लॅश आपण अनेकदा पाहिला आहे. फ्लॅश प्रकाशाच्या वेगाने पळून वीज निर्मिती करु शकतो. या सुपरहिरोचे शरीर एखाद्या बॅटरीसारखे काम करते. अर्थात ही एक काल्पनिक व्यक्तिरेखा आहे. परंतु फ्लॅशसारखेच एकूण १२ लोक भारतात सापडले आहेत. या लोकांकडे सुपरहिरो फ्लॅशप्रमाणेच केवळ हात लावून बल्ब पेटवण्याची क्षमता आहे.
तेलंगणामधील अदिलाबाद गावात राहणाऱ्या १२ जणांकडे केवळ हात लावून बल्ब पेटवण्याची क्षमता आहे. अदिलाबाद हा अतिशय दुर्गम भाग आहे. या भागात अद्याप वीज पोहोचलेली नाही. इथले स्थानिक आजही रॉकेलवरील दिव्याच्या मदतीने आपले जीवन व्यतित करतात. या पार्श्वभूमीवर केवळ हात लावून बल्ब पेटवणे हे नक्कीच एखाद्या चमत्कारासारखेच त्यांना वाटते. या लोकांच्या शरीरावरील कोणत्याही भागावर बल्ब ठेवला असता तो पेटतो. हा बल्ब पेटवण्याचा खेळ पाहण्यासाठी दररोज गावकरी या लोकांच्या घरासमोर जमा होतात. गावकरी या प्रकाराला देवाचा चमत्कार असे म्हणतात.
उर्जा तज्ज्ञ जे उत्तम यांनी या लोकांच्या शरीरावर विशेष संशोधन केले आहे. त्यांनी या बल्ब पेटवण्याच्या प्रकाराला चमत्कार म्हणून मान्य करण्यास नकार दिला आहे. त्यांच्या मते मानवी शरीर वीजवाहक आहे. त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकाच्या शरीरात बायोलॉजिकल इलेक्ट्रिसिटी असते. परंतु या विजेचा वापर करुन बल्बसारखे कोणतेही उपकरण चालवता येत नाही. कारण कोणतेही इलेक्ट्रिक उपकरण चालवण्यासाठी अधिक उर्जा लागते. आणि आपले शरीर बॅटरीप्रमाणे वीज साठवून त्या उर्जेचा वापर करु शकत नाही. अद्याप या चमत्कारिक प्रकारामागील वैज्ञानिक कारण स्पष्ट झालेले नाही.