Raksha Bandhan : भारतात आज रक्षाबंधनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. अशातच राजस्थानच्या श्रीगंगानगर येथील रहिवासी २३ वर्षीय जगदेव सिंग यांना नुकतेच अहमदाबादहून त्यांच्या ‘दीदी’कडून राखीसह पत्र मिळाले आहे. सख्ख्या नसूनही रक्ताचं नातं असलेल्या या भावंडांची कहाणी तुमच्याही डोळ्यात पाणी आणेल. टाइम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, मागील दोन वर्षांपासून जगदेव यांना त्यांची अहमदाबाद येथील बहीण राखी पाठवतेय. नेमकं हे नातं काय ही कहाणी जाणून घेऊया…
जगदेव यांचे मेहुणे निर्मल यांनी सांगितले की, जगदेव २०१९ मध्ये शेतातील हापशीजवळ काम करत होता. काम करत असताना मोटार खराब झाली. रविवार असल्याने आजूबाजूला कोणीही नसल्याने जगदेवने स्वतःच बिघाड दुरुस्त करण्याचे ठरवले. त्याने विजेच्या तारा जोडण्याचा प्रयत्न केला असता त्याला विजेचा धक्का बसला. ओव्हरहेड हाय-टेन्शन तारांचा विद्युतप्रवाह इतका जबरदस्त होता की त्यामुळे त्याचे हात-पाय गंभीर भाजले. त्याचा जीव वाचवण्यासाठी त्याचे दोन्ही हात आणि पाय कापण्यात आले.
दुसरीकडे अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये २०२१ मध्ये ब्रेन-डेड तरुणाच्या कुटुंबाने हात दान करण्यास सहमती दिल्याने जगदेवला आयुष्यात आशेचा किरण दिसला. रस्ता अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने संबंधित तरुणाला ब्रेन डेड घोषित करण्यात आले होते.
जगदेवच्या कुटुंबीयांनी सांगितले की, संबंधित ब्रेन डेड कुटुंबाने केवळ हातच नाही तर एक जन्मभराचं नातं सुद्धा आमच्या मुळाशी जोडले आहे. अवयव दात्याची बहीण जगदेवला आपला भाऊ मानते. तिच्याच भावाचा हात जगदेवचा असल्याने या हातांच्या रूपाने तिचा भाऊ जगदेवमध्ये आहे. जगदेवच्या प्रत्यारोपित हातांना बांधलेल्या प्रेमाच्या धाग्याचा आम्ही आदर करतो.”
हे ही वाचा<< बाईपण भारी देवा’ची हवा कायम! काळाचौकीच्या महागणपतीच्या आगमनाला रंगला मंगळागौरीचा खेळ, Video पाहा
दरम्यान, या नव्या हातांचा वापर करायला अजूनही जगदेवला वेळ लागत आहे. पण या हात व पायांमुळे त्याला आयुष्य जगण्याची नवी उमेद मिळाली आहे हे ही तो सांगतो. अशा या सख्ख्या नसूनही रक्ताच्या बहीण भावाच्या नात्याची कहाणी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा.