आंतरराष्ट्रीय पॉपस्टर ब्रायन अॅडम्स लाइव्ह कन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी भारतात आला आहे. नुकताच ब्रायनचा दिल्लीत एक कन्सर्ट पार पडला. दिल्लीकरांकडून ब्रायन अॅडम्सला मिळालेल्या तुफान प्रतिसादामुळे ब्रायनही खूश होता. पण या कन्सर्टदरम्यान एका दृश्यानं ब्रायनला खूपच चकित केलं. रात्रीच्यावेळी कन्सर्ट परिसरात धुरकं पसरलं होतं. या धुरक्यात ब्रायन अॅडम्सची मोठी सावली दिसत होती. ब्रायननं आतापर्यंत असं ‘चमत्कारीक’ दृश्य कधीही पाहिलं नव्हतं, त्यामुळे ‘अतुल्य भारतातील चमत्कारीक क्षण’ म्हणत ब्रायननं हा फोटो शेअर केला. मात्र हा कोणताही चमत्कार नसून दिल्लीकरांसाठी धोक्याची घंटा असल्याचं ब्रायनला फार उशीरा लक्षात आलं.
साधरणं याच काळात दिल्लीत प्रदुषणाची पातळी खूप वाढते. धुकं आणि धूर यामुळे धुरकं पसरतं. या धुरक्यामुळे श्वास घेणंही अवघड होतं, अनेकदा याच धुरक्यामुळे अपघातही होतात. त्यामुळे हा चमत्कार नसून धुरक्यामुळे ब्रायनची मोठी सावली दिसू लागली हे ब्रायनला त्यावेळी लक्षात आलं नाही.
२०१८ च्या जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगातील सर्वात प्रदूषीत शहरांच्या यादीत दिल्ली ही सहाव्या क्रमांकावर आहे. तर गेल्या काही वर्षांपासून इथे हवेची पातळी खूपच खालावत चालली आहे.