मद्यप्रेमींना सतावणारी एक बातमी सध्या सगळीकडे चर्चेत आहे. ती म्हणजे बडवायझर या कंपनीचा कर्मचारी गेली १२ वर्ष बिअर टँकमध्ये लघुशंका करत होता. ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली असून अनेकजण शेअर करत आहेत. ही बातमी तुमच्यापर्यंतही पोहोचली असेल आणि शेअर करणार असाल तर थोडं थांबा. कारण हे वृत्त खोटं आहे. अशी कोणतीही घटना किंवा प्रकार घडलेला नाही.

एका वेबसाईटने उपहासात्मक पद्धतीने हे वृत्त दिलं होतं. पण काही वेळातच अनेकांनी बातमीचे फोटो ट्विटर तसंच सोशल मीडियावर इतर ठिकाणी शेअर करण्यास सुरुवात केली. त्यामुळे ही बातमी वाऱ्यासारखी वेगाने पसरली आणि व्हायरल झाली. पण तुमच्या माहितीसाठी ही बातमी पूर्णपणे खोटी आहे.

foolishhumour.com या वेबसाईटने हा बातमी प्रसिद्ध केली होती. बडवायझरच्या कर्मचाऱ्याने आपण १२ वर्ष बिअर टँकमध्ये लघुशंका करत असल्याचं मान्य केलं असं या बातमीचं हेडिंग होतं. या बातमीत वॉल्टर या कर्मचाऱ्याने ही माहिती दिल्याचाही उल्लेख होता. कर्मचाऱ्याने एकूण ७५० कर्मचारी कंपनीत असून प्रत्येकावर लक्ष ठेवणं शक्य नाही असं सांगितल्याचंही बातमीत उल्लेख आहे. पण महत्त्वाचं म्हणजे बातमीच्या शेवटी ही वेबसाईट फक्त मनोरंजनासाठी असून आमची माहिती ही सगळी काल्पनिक असून त्यात सत्यता नसल्याचाही उल्लेख आहे.

अनेकांनी तर या बातमीवरुन मीम आणि जोक तयार केले असून सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

त्यामुळे तुमच्यापर्यंत आलेली प्रत्येक माहिती पडताळल्याशिवाय पुढे पाठवू नका.