न्युयॉर्कमधील आलेल्या हिमवादळामुळे तेथील लोकांचे जीवजीवन विस्कळीत झाले आहे. या हिमवादळामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अशातच आता एक अत्यंत हृदयद्रावक अशी घटना समोर आली आहे. ती म्हणजे न्यूयॉर्कमधील बफॅलो येथील एका २२ वर्षीय तरुणीची कार हिमवादळात अडकल्यामुळे तिचा कारमध्येच मृत्यू झाला आहे. शिवाय या तरुणीने मृत्यू डोळ्यांसमोर दिसत असताना आपल्या कुटुंबीयांना हिमवादळातील शेवटचा एक व्हिडीओ आपल्या पाठवला आहे.
हिमवादळात मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव अँडेल टेलर असं असून ती शुक्रवारी दुपारी घरी जात असताना तिची कार बर्फात अडकली होती. धक्कादायक बाब म्हणजे ती तब्बल १८ तास कारमध्ये अडकली होती. तिच्या कारच्या सभोवताली बर्फ साचला होता आणि ती खूप घाबरली होती असं तिच्या कुटुंबीयांनी सांगितलं.
तिने घरच्यांशी संपर्क केला त्यावेळी ‘मी कारमध्ये अडकली असून मला खूप भिती वाटतं आहे’ असं अँडेल टेलरने तिच्या कुटुंबीयांना सांगितलं होतं. याचवेळी तिने कारमधून बाहेर हिमवादळामुळे होणाऱ्या बर्फवृष्टीचे व्हिडीओ शूट करुन कुटुबीयांना पाठवला. या तरुणीने कुटुंबीयांना पहिला व्हिडीओ शुक्रवारी संध्याकाळी ४.१५ च्या सुमारास पाठवला त्यावेळी तिच्या कारचे विंडोशील्ड पूर्णपणे बर्फाने झाकल्याचं दिसतं होतं. त्यानंतर तिने ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला मध्यरात्रीनंतर दुसरा व्हिडिओ पाठवला त्या व्हिडिओमध्ये तिने कारची खिडकी थोडीशी खाली करत बाहेरील हिमवादळ मोबाईलच्या कॅमेऱ्यात शूट केलं आणि कुटुबीयांना पाठवलं.
टेलरची बहीण शॉनेक्वा ब्राउनने WCOS ला सांगितले की, ‘माझ्या बहिणीने ती खूप घाबरली होती असं मला सांगितलं’, तर काही वेळानंतर तिचा आणि कुटुंबीयांचा संपर्क तुटला आणि त्यानंतर काही तासांनी २२ वर्षीय अँडेल टेलर तिच्या कारमध्ये मृतावस्थेत आढळली. दरम्यान या तरुणीसह जवळपास २८ लोकांचा या न्यूयॉर्कच्या पश्चिम शहरात झालेल्या हिमवादळात मृत्यू झाला आहे.
दरम्यान, ‘आमची मुलगी किती संकटात होती याचा आम्हाला अंदाज आला नव्हता’, असं तरुणीच्या कुटुंबीयांनी सांगितलं. मृत तरुणीच्या आई म्हणाली, “हिमवादळ किती गंभीर आहे याची काहीच माहिती नव्हती. याबाबतची कसली बातमीही मी पाहिली नव्हती. आम्हाला बफॅलोमध्ये काय चालले आहे हे खरोखर माहित नव्हतं’, असं मुलीच्या आईने सांगितलं. तर आपल्या मुलीने 911 नंबरवर मदतीसाठी कॉल केला होता आणि ती आपत्कालीन मदतीची वाट पाहत होती. परंतु, तिच्यापर्यंत मदत पोहोचू शकली नसल्याचंही तिची आई म्हणाली.
या तरुणीचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत माहिती समोर आली नाही. मात्र, कारच्या एक्झॉस्ट पाईपमध्ये बर्फ गेल्यामुळे ती ब्लॉक झाली आणि कार्बन मोनोऑक्साइडच्या विषबाधामुळे टेलरचा मृत्यू झाला असल्याचं तिच्या आईने सांगितलं. टेलरची दुसरी बहीण टोमेशिया ब्राउनने तेथील अग्निशमन विभाग, पोलीसांसह आपत्कालिन मदत केंद्रावर निराशा व्यक्त केली आहे.
दरम्यान, न्युयॉर्कमध्ये आलेले हिमवादळ आत्तापर्यंत नोंदवलेल्या हिमवादळांपैकी सर्वात मोठ आणि थंड ख्रिसमस वादळांपैकी एक असल्याचं म्हटलं जातं आहे. शिवाय या हिवाळी वादळामुळे बफॅलोला सर्वाधिक फटका बसला असून आतापर्यंत २८ लोकांचा मृत्यू झाला आहे त्यामध्ये टेलरचाही समावेश आहे.