मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेची काल (गुरुवारी) नाशिक येथील सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थिती औपचारिक सांगता झाली. या सभेमध्ये मोदींनी ‘मी देवेंद्र फडणवीस यांना नमन करण्यासाठी आलो आहे. चार हजार किमीच्या यात्रेत कोट्यवधी लोकांनी आशीर्वाद दिला आहे’ असे वक्तव्य करत आपल्या भाषणाला सुरुवात केली. या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांबरोबरच इतरही अनेक नेत्यांची भाषणं झाली. एकीकडे महाजनादेश यात्रेची सांगता झाली असताना दुसरीकडे या यात्रेसंदर्भातील अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत. सध्या मुंबई, पुणे आणि एकंदरितच महाराष्ट्रामध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांच्या विषयाने जोर धरला असून याच पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेतील रथ (म्हणजेच बस) खड्ड्यात अडकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी १ ऑगस्टपासून सुरु केलेली महाजनादेश यात्रा पाचव्या दिवशी म्हणजेच ५ ऑगस्ट रोजी चंद्रपूरमध्ये होती. सकाळी ११ वाजताच्या सुमारास यात्रा फडणवीसांच्या आजोळी म्हणजेच मूलमध्ये होती. मूलमध्ये त्यांनी सभा घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र सभेनंतर मैदानातून बाहेर निघताना फडणवीस यांच्या रथाचे खड्ड्यामध्ये अडकले. रथाचे चाक खड्ड्यात अडकले तेव्हा मुख्यमंत्री रथाच्या टपावर होते. यावेळेस मुख्यमंत्र्यांबरोबर मंत्रीमंडळातील सहकारी सुधीर मुनगंटीवार आणि राधाकृष्ण विखे पाटीलही उपस्थित होते. गाडी चिखलात रुतल्यानंतर काही वेळाने संपूर्ण प्रकार मुख्यमंत्र्यांना कळवण्यात आला. त्यानंतर गाडीला धक्का मारुन चाक खड्ड्यातून बाहेर कढण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले. दरम्यान गाडी रेस करुन बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु केल्याने गाडीचे चाक खड्ड्यातील चिखलामध्ये जागेवरच फिरु लागले. बऱ्याच प्रयत्नांनी गाडीचे चाक निघत नसल्याचे पाहून कार्यकर्त्यांनी गाडीला धक्का देत बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु केले. सुरक्षेच्या कारणामुळे मुख्यमंत्री आणि इतर सहकारी टपावरुन खाली उतरुन गाडीमध्ये बसले. शेवटी बऱ्याच प्रयत्नांनंतर या रथाचे चाक खड्ड्यामधून बाहेर पडले आणि यात्रा मार्गस्थ झाली. मात्र तोपर्यंत मुख्यमंत्र्यांचीच गाडी खड्ड्यात अडकल्याचे पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली जमली होती. यासंदर्भातील वृत्त ‘टीव्ही 9’ या वृत्तवाहिनीने दिल्यानंतर त्यावरुन महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरुन या वृत्तांकनाचा व्हिडिओ शेअर करत ‘हाच सरकारचा मागील पाच वर्षाचा विकास’ असा टोला लगावण्यात आला होता. हाच व्हिडिओ आता रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न चर्चेत असताना व्हायरल झाल्याचे पहायला मिळत आहे.
चंद्रपूर : महाजनादेश यात्रा : मुख्यमंत्र्यांच्या रथाचं चाक रस्तावरील गड्याच्या चिखलात फसल बघ्याची झाली गर्दी जनता महणाली हाच आहे मागील पाच वर्षाचा विकास @charulata_tokas @NANA_PATOLE @MLAYashomatiT @INCMaharashtra @VijayWadettiwar
pic.twitter.com/hei1JOBRJB— Maharashtra Pradesh Mahila Congress (@MaharashtraPMC) August 5, 2019
दरम्यान मुख्यमंत्र्यांची ही महाजनादेश यात्रेची १९ व्या दिवशी भव्य सभेमध्ये सांगता झाली. या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारच्या कामांचा पाढा वाचून दाखवला.