अभिनेत्री सुष्मिता सेन आणि आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांनी अलीकडेच सोशल मीडियावर आपल्या नात्याची कबुली दिली आहे. यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मागील अनेक वर्षांपासून देशाबाहेर असणारे आणि आयपीएलमध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका असणारे ललित मोदी आणि सुष्मिता सेन रिलेशनमध्ये असल्याचा मुद्दा सोशल मीडियावर फारच चर्चेत आहे. याच पार्श्वभूमीवर उद्योगपती हर्ष गोएंका यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी आणि फरार उद्योगपती नीरव मोदी या तिघांची तुलना करत मार्मिक ट्वीट केलं आहे.
उद्योगपती हर्ष गोएंका हे सद्यस्थितीवरील मार्मिक ट्वीट्ससाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी ललित मोदी आणि सुष्मिता सेनप्रकरणी नुकतीच काही ट्वीट्स केली होती, जी खूप व्हायरल झाली. आता त्यांनी तीन मोदी वेगवेगळ्या कारणांसाठी हवेहवेसे असल्याचे सांगत आणखी एक ट्वीट केलं आहे. यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, ललित मोदी आणि नीरव मोदी यांचा फोटो देखील वापरला आहे.
हर्ष गोएंका यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, “एका मोदींना इंडिया हवा आहे. दुसऱ्या मोदीला ‘मिस इंडिया’ हवी आहे आणि तिसरा मोदी इंडियात हवा आहे.” गोएंका यांचं हे ट्वीट सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं आहे. आतापर्यंत या ट्वीटला साडेपाच हजाराहून अधिक लाइक मिळाले असून अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
ललित मोदी यांनी सुष्मिता सेनसोबत नात्यात असल्याचा खुलासा केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी हर्ष गोएंका यांनी भन्नाट ट्वीट केलं होतं. गोएंका आपल्या उपरोधिक ट्विटमध्ये म्हणतात, “मी ललितला फोन केला आणि विचारलं की तुला हे कसं जमलं? तो मला ‘सेन’सेशनल उत्तर देत म्हणाला, “मोदी है तो मुमकिन है.” हर्ष गोयंका यांचं हे ट्वीटही सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.