Cab Driver Trending Video : टॅक्सीने प्रवास करताना अनेकदा प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. कधी चालक अत्यंत उद्धटपणे बोलतात, कधी नशेत धोकादायक पद्धतीने टॅक्सी चालवतात, कधी लाँग रुटने नेत अवाच्या सव्वा भाडे आकारून प्रवाशांची लूट करतात. विशेषत: रात्रीच्या वेळी प्रवास करताना अशाप्रकारच्या घटना सर्रासपणे घडतात. त्यामुळे टॅक्सी चालकांच्या या संतापजनक वागण्याचा फटका प्रवाशांना सहन करावा लागतो. सध्या एका महिलेच्या बाबतीतही अशीच एक धक्कादायक घटना घडली. या घटनेत एका महिलेला तिच्या वजनामुळे टॅक्सीत बसण्यास चालकाने विरोध केला आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या महिलेने जाडं असणं गुन्हा आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच तिने संबंधित टॅक्सी अॅपविरोधात खटला दाखल केला आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
ऑनलाइन कॅब बुकिंग अॅपशी संबंधित हे प्रकरण आहे. जे जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही प्रश्न पडेल की यात चूक कोणाची, महिलेची की टॅक्सी चालकाची. प्लस साइज इन्फ्लुएंसर आणि म्युझिक आर्टिस्ट डाजुआ ब्लँडिंग अशी या महिलेची ओळख आहे, जिने संबंधित राइड ॲप LYFT विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यात तिने आरोप केला की, टॅक्सी चाकलाने तिच्या अधिक वजनामुळे तिला टॅक्सीमध्ये बसू दिले नाही, या घटनेशी संबंधित एक व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो आता खूप वेगाने व्हायरल होत आहे.
“मॅडम! टायर तुमचे वजन सांभाळू शकत नाही”
व्हिडीओच्या सुरुवातीला एक कार दिसत आहे. काही वेळाने काही आवाज ऐकू येतायत. व्हिडीओ काळजीपूर्वक पाहिल्यानंतर आणि ऐकल्यानंतर दाजुआ आणि टॅक्सी चालकामध्ये बसण्यावरून वाद झाल्याचे समोर आले आहे. वास्तविक दाजुआने एक टॅक्सी बुक केली होती, जी तिने नमूद केलेल्या ठिकाणी पोहोचते, पण दाजुआचे वजन पाहून चालक तिला टॅक्सीत बसण्यास विरोध करतो.
व्हिडीओमध्ये स्पष्टपणे ऐकू येत आहे की, टॅक्सी चालक दाजुआला सांगतो की, ‘मला माफ करा मॅडम, माझी कार छोटी आहे.’ मात्र, यावर दाजुआ ती या टॅक्सीत बसू शकते असे सांगते. यानंतर टॅक्सी चालक म्हणतो की, त्याच्या टॅक्सीचे टायर इतके वजन सांभाळू शकणार नाही, त्यामुळे तुम्ही तुमच्यासाठी Uber XL कॅब बुक करा.
महिलेचे २२१ किलो वजन
अहवालानुसार, दाजुआचे वजन ४८९ पौंड (२२१ किलो) आहे. एका मुलाखतीत दाजुआने सांगितले की, ती याआधी यापेक्षा लहान कारमध्ये बसली होती, यावेळी तिला तिच्या वजनामुळे कधीही अडचण आली नाही. वजनामुळे सर्व्हिस नाकारणे हे मिशिगन कायद्यानुसार सुरक्षेचे उल्लंघन असल्याचे तिने सांगितले. या प्रकरणानंतर राइड ॲप LYFT ने कॅब चालकाला टर्मिनेट केलं आहे.
“इतके लठ्ठ असणे बेकायदा असावे” युजरच्या प्रतिक्रिया
हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. डेली स्नीड अकाउंटवरून पोस्ट केलेला हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. यावर सोशल मीडिया युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिले की, नाही, कॅब चालक बरोबर होता. त्याचवेळी दुसऱ्या युजरने लिहिले की, इतके लठ्ठ असणे बेकायदा असावे. आणखी एकाने लिहिले की, वाद घालण्यात काय अर्थ आहे, पिकअप कॅन्सल करा आणि गाडी स्टार्ट करून निघून जा.